झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध एफआयआर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीबीआयने झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्र आणि इतर चौघांविरुद्ध 1,322 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करून कर्ज घेतल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. सुभाष चंद्र यांनी बनावट निव्वळ संपत्ती प्रमाणपत्रे सादर करून आपल्या कंपन्यांसाठी कर्ज घेतले आणि नंतर ती प्रमाणपत्रे मागे घेतली, असा एलआयसीचा आरोप आहे.

सुभाष चंद्र हे झी मीडियाचे मालक असलेल्या एस्सेल ग्रुपचे प्रमुख आणि झी एंटरटेनमेंटचे माजी अध्यक्ष आहेत. सीबीआयने सुभाष चंद्र यांच्या व्यतिरिक्त पंकज सुरोलिया, अमिश पंड्या आणि राजीव ढोलकिया यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. या चौघांवर 2018 ते 2026 दरम्यान फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष चंद्र यांनी 2018 मध्ये मे. वसंत सागर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या इतर कंपन्यांसाठी कर्ज घेतले. हे कर्ज मिळवण्यासाठी, त्यांनी एक निव्वळ संपत्ती प्रमाणपत्र सादर केले, ज्यात त्यांची वैयक्तिक निव्वळ संपत्ती 59,113 कोटी रुपये दाखवण्यात आल्याचा एलआयसीचा आरोप आहे. या मोठ्या निव्वळ संपत्तीच्या आधारावर एलआयसी एचएफएलने त्यांच्या कंपन्यांना 1,322 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कर्जे मंजूर केली. मात्र, एस्सेल ग्रुपच्या कंपन्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर सुभाष चंद्र यांच्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्यात आली.

Comments are closed.