अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा – अल्काराझ, सबालेंका यांचा दबदबा कायम
गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि अव्वल मानांकित आर्यना सबालेंका यांनी अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवले. चार महिन्यांच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या अल्काराझने महत्त्वाच्या क्षणी संयम राखत सामन्यावर पकड मिळवली.
स्पेनच्या अल्काराझने चीनच्या वू यीबिंगचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-१ असा फडशा पाडला. पुढच्या फेरीत अल्काराझसमोर अमेरिकेच्या टॉमी पॉलचे आव्हान असेल. पॉलने अलेक्झांडर बुब्लिकला पाच सेटच्या झुंजीत हरवून पुढची फेरी गाठली आहे. महिला एकेरीत अव्वल मानांकित सबालेंकाने कामिला राखिमोव्हाचा ६-३, ६-४ असा पराभव केला. सलग पाचव्या वर्षी तिने यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. आता तिची गाठ अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडशी पडणार आहे.
विल्यम्स भगिनींनी जिंकली मने
सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनींचे यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुनरागमन बहुचर्चित ठरले, पण या स्टार अमेरिकन जोडीला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. आर्थर ॲश स्टेडियमवरील २३ हजार प्रेक्षकांनी या दिग्गज भगिनींच्या पुनरागमनाचा सोहळाच साजरा केला. ऑस्ट्रेलियाची माया जॉइंट आणि तैवानची चॅन हाओ-चिंग यांनी विल्यम्स भगिनींना ६-३, ६-७ (६), ७-६ (१०-७) असे पराभूत केले.
Comments are closed.