IND vs PAK: टीम इंडियाचा पाकविरुद्ध 7 विकेट्सने दणदणीत विजय! आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

महिला आशिया कप 2026 (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत 5 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर ऑलआउट झाला. या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सामना सहज जिंकत स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे .
याआधी भारताने थायलंड आणि हाँगकाँगच्या महिला संघांचाही एकतर्फी पराभव केला होता.
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मुनीबा अलीने 15 चेंडूंमध्ये 13 आणि शवाल जुल्फिकारने 14 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या आणि त्या बाद झाल्या. भारतीय गोलंदाजांसमोर या खेळाडूंना काहीही विशेष करता आले नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गुल फिरोझाने 4 चेंडू खेळले, पण खाते न उघडताच ती माघारी परतली. दुसरीकडे, आयशा जफर 7 चेंडूंमध्ये 2 धावा करून बाद झाली. सदाफ शमास आणि कर्णधार फातिमा सना यांनीही खराब कामगिरी केली.
भारताकडून श्री चरणी आणि क्रांती गौड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. चरणीने 4 षटकांत केवळ 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच प्रेमा रावतने 4 षटकांत 9 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून शेफाली वर्माने (Shefali Varma) 1 आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 2 गडी बाद केले.
छोट्या पाठलाग करताना भारताने 8.4 षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून शेफाली वर्माने 6 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी केली, तर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 11 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या. तसेच प्रतिका रावल 3 चेंडूंमध्ये 4 धावा करून बाद झाली. भारताचे सुरुवातीलाच 3 खेळाडू पटपट बाद झाले, पण लक्ष्य छोटे असल्यामुळे भारताला विजयासाठी कोणतीही अडचण आली नाही. हरमनप्रीत कौरने 18 चेंडूंमध्ये 18 आणि दीप्ती शर्माने 14 चेंडूंमध्ये 12 धावांची नाबाद खेळी केली. अशा प्रकारे भारताने पाकविरुद्ध वर्चस्व राखून हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे.
Comments are closed.