आसनगाव रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा स्टेशन मास्तरला घेराव
टिटवाळा रेल्वे स्थानकातील कामासाठी सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकलसेवेचा आज फज्जा उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो रेल्वे प्रवाशांनी आसनगाव स्थानक प्रबंधकांना (स्टेशन मास्तर) सकाळी घेराव घालून जोरदार निदर्शने केली. मेगाब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडून गेल्याने मेल-एक्सप्रेस गाड्यांना आसनगाव येथे थांबा देऊन पुढील प्रवासाची सोय करावी, अशी जोरदार मागणी यावेळी प्रवाशांनी केली.
टिटवाळा स्थानकातील ट्रॅक शिफ्टिंग आणि फलाट लांबी वाढविण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका कसारा, आसनगाव, शहापूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना बसत आहे. पर्यायी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात मध्य रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे. लोकलच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचा आरोप कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. त्यातच मेल-एक्सप्रेस गाड्या उपलब्ध असतानाही त्यांना थांबा दिला जात नसल्याने संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी आसनगाव स्थानक प्रबंधक सुहासकुमार मणियार यांना घेराव घालत मेल-एक्सप्रेस गाड्यांना आसनगाव येथे थांबा द्यावा, अशी मागणी केली.
उद्यापासून व्यवस्थित नियोजन
कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांच्यासह कौस्तुप लिमये, हर्शल जगे, सुमेध जाधव यांनी रेल्वे प्रवाशांसह मणियार यांची भेट घेतली. रेल्वेच्या वरिष्ठ परिचालन अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून ग्रामीण भागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. त्यावर येत्या सोमवारपासून व्यवस्थित नियोजन केले जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले असल्याचे रेल्वे संघटनेचे सचिव उमेश विशे यांनी सांगितले.
Comments are closed.