नाम बडे, लक्षण खोटे…वीज चोरणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीला दंड, ‘स्वच्छ कारभार’ विकासाचे दावे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘स्वच्छ कारभार’ आणि विकासाचे दावे करणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायतीने वीज चोरीचा कारनामा केला आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर महावितरण कंपनीने वायर आणि अन्य साहित्य जप्त करून ग्रामपंचायतीला दंड ठोठावला आहे. ग्रामपंचायतीची वीज चोरी उघडकीस आल्यानंतर नाम बडे, लक्षण खोटे अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.

ग्रामपंचायतीने हजारे नगर परिसरात थेट मेन लाइनवरून प्रेशर मशिनसाठी बेकायदा वीजजोडणी घेतली होती. हा वीजपुरवठा सुरू असतानाच महावितरणच्या भरारी पथकाने येथे छापा मारला आणि बेकायदेशीर वीजजोडणी तोडून पंचनामा केला. महावितरणने ग्रामपंचायत प्रशासनाला दंडासह वीज बिल भरण्याचे निर्देश दिले असून बिल न भरल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून बिल भरण्याची तयारी दर्शविण्यात आल्याची माहिती महावितरण कर्मचारी यांनी दिली आहे.

* ग्रामपंचायत परिसरातील आणखी एका कथित वीज चोरीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी ठोस पुरावा हाती न लागल्याने कारवाई झाली नव्हती, मात्र यावेळी प्रत्यक्ष जोडणी पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

* या प्रकरणावर भूमिका जाणून घेण्यासाठी ग्रामसेवक संजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

* विकासाची जाहिरात आणि स्वच्छ प्रशासनाचे दावे एकीकडे, तर दुसरीकडे मालमत्तेलाच कथित बेकायदेशीर वीजजोडणी, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

Comments are closed.