मणिपूरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार.

लष्कर-आसाम रायफल्सची संयुक्त कारवाई

► वृत्तसंस्था / इंफाळ

मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचे (युकेएनए) दोन दहशतवादी ठार झाले. तसेच इतर दोघे जखमी झाले. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रs, दारूगोळा आणि लढाऊ गणवेश जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी हेंगलेप उपविभागातील फायबोंग गावात एक मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी ‘युकेएनए’च्या छावणीवर पाळत ठेवत दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली. पहाटे सुमारे 5:30 वाजता ‘युकेएनए’च्या सदस्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यामुळे सैनिकांना नियंत्रित गोळीबाराचा अवलंब करावा लागला. यावेळी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले असून आजूबाजूच्या जंगलांमध्ये शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

Comments are closed.