मध्य प्रदेशात विषारी दारूमुळे कहर
सागर जिल्ह्यात 14 मद्यपींचा मृत्यू : 25 हून अधिक जण इस्पितळात
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील सागर जिह्यातील बांदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विषारी दारूमुळे संशयास्पद परिस्थितीत मृत्यूंची मालिका सुरू आहे. आतापर्यंत 14 हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. या मृत्यूंमागे विषारी किंवा अवैध दारू हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर बांदा परिसरातील अर्धा डझनहून अधिक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत्यूंच्या या सत्रामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात कसून तपासणी सुरू असून सहायक उत्पादन शुल्क आयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दारू प्यायल्यानंतर अनेक लोकांना उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप आणि इतर लक्षणे जाणवत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आठ-दहा रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दारू सेवन केलेल्या लोकांचे शरीर निळे पडत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. मृत्यू आणि अत्यवस्थ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आरोग्य विभागाने बाधित गावांमध्ये निगराणी वाढवली आहे. आरोग्य विभागाची पथके आता बाधित गावांमध्ये घरोघरी जाऊन लोकांची तपासणी आणि नमुने गोळा करत आहेत. प्रशासनाने गेल्या काही दिवसांत दारू प्यायलेल्या लोकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात जावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
6 हून अधिक दारूची दुकाने सील
या घटनेनंतर प्रशासनाने बांदा परिसरातील 6 हून अधिक दारूची दुकाने सील केली आहेत. या दुकानांमधून दारूचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले जात आहेत. बाधित लोकांनी दारू कोठून खरेदी केली आणि या मृत्यूंमध्ये विषारी किंवा अवैध दारूची भूमिका काय होती, याचा तपास प्रशासन आता करत आहे. प्रशासनाने अवैध दारू व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दारूची दुकाने सील करण्यात आली असून नमुने तपासणी सुरू करण्यात आली आहे. अवैध दारू व्यापारात सामील असलेल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या संभाव्य नेटवर्कबद्दलही पोलीस माहिती गोळा करत आहेत. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
सागर जिल्ह्यातील बांदा ब्लॉकच्या नौरज आणि गुगरा खुर्द गावांमध्ये झालेल्या मृत्यूंची माहिती मिळताच सागर जिल्ह्याचे आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेत घेण्यासोबतच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस आणि प्रशासकीय पथके संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
काँग्रेसकडून सरकारवर निशाणा
विषारी दारूप्रकरणी सागरमधील मृत्यूंच्या संदर्भात मध्यप्रदेश काँग्रेसने मोहन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यप्रदेशात पुन्हा एकदा विषारी दारूने हाहाकार माजवला असून दारू माफियांचा धुमाकूळ गुजरातपासून मध्यप्रदेशपर्यंत बळी घेत असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे. या मृत्यूंसाठी मोहन सरकारला थेट जबाबदार धरत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दारू माफियांविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे.
Comments are closed.