गणेशोत्सव प्रवासाचा ट्रेलर, माणगाव शहरात तुफान वाहतूककोंडी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गोपाळकाला आणि रविवारची सुट्टी यामुळे मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेले पर्यटक आणि चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर आज गणेशोत्सव प्रवासाचा ट्रेलर मुंबई-गोवा महामार्गावर पाहायला मिळाला. माणगाव परिसरात तुफान वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

साप्ताहिक सुट्टीला जोडून आलेल्या सुट्टीमुळे कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि पर्यटक दाखल झाले होते. आज हे पर्यटक आणि चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणगाव परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने चालकांना बराच वेळ वाहतूककोंडीत अडकून राहावे लागले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. माणगाव शहरात वाहतूककोंडी ही नेहमीची झाली आहे. इंदापूर ते माणगाव आणि माणगाव ते लोणेरे या सुमारे २० किलोमीटरच्या अंतरासाठी नेहमीच्या तुलनेने कमी वेळ लागतो. मात्र वाहतूककोंडीच्या काळात याच अंतरासाठी आज वाहनचालकांना दोन तास प्रवास करावा लागला.

गणेशोत्सव आठवडाभरावर आला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणातील आपल्या गावांकडे येतात आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या सध्याच्या तुलनेत अनेक पींनी वाढते. ही वाहतूक हाताळण्याची तयारी सुरू असतानाच आज झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रशासनाची अक्षरशः तारांबळ उडाली. गणेशोत्सवापूर्वीच प्रशासनाची कसोटी लागली.

तयारीवर प्रश्नचिन्ह
गणेशोत्सवाच्या काळात माणगाव हे कोकणातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र ठरत असल्याने शहरातून जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. माणगावमार्गे श्रीवर्धन, म्हसळा, दापोली, मंडणगड, महाड तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र आज झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments are closed.