शनैश्वर देवस्थानच्या उत्पन्नाच्या तुलनेत पगार खर्च 30 टक्क्यांपेक्षा जास्त; कायम कर्मचाऱ्यांनी पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन स्थगित होणार?

>> नवनाथ कुसळकर

अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या निव्वळ उत्पन्नाच्या तुलनेत केवळ कर्मचाऱ्यांचा पगार खर्च 30 टक्क्यांपेक्षा जास्त असून, सन 2025-2026 या आर्थिक वर्षात एकूण पगारावरील संभाव्य खर्च 20 कोटींच्या घरात गेला आहे. कायद्यातील कलम 27 (2) अन्वये विहित केलेल्या दहा टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त असून, कलम 27 मधील बाब धोरणात्मक स्वरूपाची असल्यामुळे शासनाकडे सदर अहवालात नमूद आहे. दरम्यान, वेतनश्रेणीतील 363 कायम कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 9 सप्टेंबरपासून पुकारलेले ‘काम बंद आंदोलन’ स्थगित होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

श्री शनैश्वर देवस्थानमधील विश्वस्त काळातील नियुक्त आणि 2020 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये सहावा वेतन आयोग लागू केला असून, माहे जुलैमध्ये वेतनवाढ दिली आहे. खर्चाची मर्यादा लक्षात घेऊन देवस्थानच्या लेखा शाखेच्या प्राप्त माहितीनुसार वित्तीय वर्ष 2025-2026 मधील कर्मचाऱ्यांना वेतनावरील प्रत्यक्षात खर्च 17 कोटी 44 लाख इतका झालेला आहे. यामध्ये 2020 पूर्वी नियुक्त व पूर्व विश्वस्तांनी कायम वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर खर्चात 7500 प्रमाणे वेतन देय असलेल्या 2020 नंतर भरलेले दोन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेतल्यानंतर सप्टेंबर 2025 पासून अदा केलेले नाही. ऑगस्टमध्ये या कर्मचाऱ्यांना वेतनावरील मासिक खर्च 34 लाख 70 हजार 500 होता. सदरचा खर्च गृहीत धरल्यास मार्च 2025 पर्यंत दोन कोटी 50 लाख इतकी रक्कम त्यांच्या बिलावर खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, यावर नियंत्रण आणले आहे. शासनाने 22 सप्टेंबर 2025 पासून देवस्थान ताब्यात घेतल्यानंतर येथील प्रशासनाने सध्या जे कर्मचारी कामावर उपस्थित असतात, त्यांचा खर्च गृहीत धरलेला आहे.

वेतनश्रेणीमधील कायम 363 कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 9 सप्टेंबरपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांचे वर्षभरातील हे दुसरे आंदोलन आहे. यामध्ये कायम कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही. वेतन फरकाची 50 टक्के रक्कम अदा करावी. कायम कर्मचाऱ्यांना ज्यादा कामाचा मोबदला मिळावा, यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी कर्मचारी युनियन यांना आंदोलन करू नये, यासाठी रीतसर पत्रव्यवहार केला आहे.

पूर्व विश्वस्तकाळातील विविध अनियमिततेबाबत धर्मादाय आयुक्त स्तरावरील 41 ड चौकशी प्रलंबित आहे. देवस्थान कायदा 2018 मधील विविध कलमान्वये देवस्थान कामकाज सुरळीत ठेवणे व ते रोखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सदर स्थितीत श्रावण महिन्यात मोठय़ा प्रमाणात भाविक भेट देत असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन करू नये, असे पत्राद्वारे सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन स्थगित होणार की, कर्मचारी आंदोलनावर ठाम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य विम्याचे नियम पाळले

देवस्थान कर्मचाऱ्यांचे आरोग्य विमा सुविधेबाबत प्रशासक तथा विभागीय आयुक्त यांच्याकडे दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजीचे पत्र मान्यताप्राप्त झाले असून, हेल्थ इन्शुरन्स 2026-2027 पूर्व विश्वस्त काळातील व्यवस्था कायम ठेवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार देवस्थानमधील कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले.

Comments are closed.