महापुरानंतर सापडलेल्या मौल्यवान वस्तू बाळगणे आणि विकण्यावर बंदी; नेपाळ पोलिसांचा कारवाईचा इशारा
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी महापुरानंतर वाहून आलेल्या सोने, चांदी, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे स्वतःकडे ठेवणे, विकणे अथवा त्यांचे वाटप करणे बेकायदेशीर आहे, अशा वस्तू सापडल्यास त्या तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन नेपाळ पोलिसांनी केले आहे.
नेपाळ पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पुराच्या पाण्यात सापडलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्रांची माहिती नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला देऊन त्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी. पुराच्या वस्तू स्वतःजवळ लपवून ठेवणे, त्यांचा वापर करणे किंवा त्यांची खरेदी-विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल आणि अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी या निवेदनात कोणत्याही विशिष्ट घटनेचा थेट उल्लेख केला नसला, तरी धाडिंग जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. धाडिंग जिल्ह्यातील बेलखूखोला येथील त्रिशुली नदीच्या काठावर पुराच्या पाण्यात वाहून आलेले एका बँकेची तिजोरी आढळली होती. तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम पळवल्याप्रकरणी पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे.
आपत्तीच्या काळात सुरक्षा यंत्रणा, पोलीस कर्मचारी, बचाव आणि शोधकार्यात व्यस्त असतात, अशा वेळी चोरी, लुटमार आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका असतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.