Ratnagiri News – गणेशोत्सवापूर्वी मानसकोंड महामार्ग खड्डेमुक्त करा, ठेकेदाराला वारंवार सांगूनही दुर्लक्ष; गणेशभक्तांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई-गोवा महामार्गावरील मानसकोंड परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त दाखल होणार असल्याने या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे.

मानसकोंड परिसरातील महामार्गाची दुरवस्था दूर करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित असताना अधिकारी केवळ नावापुरतेच उरले आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या मार्गावर यापूर्वी अपघाताच्या घटना घडूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसून दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो वाहने कोकणाकडे येतात. त्यामुळे सणापूर्वीच महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी गणेशभक्त, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.गणेशोत्सवाच्या गर्दीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल करत संबंधित विभागाने तातडीने मानसकोंड परिसरातील खड्डे बुजवून महामार्ग खड्डेमुक्त करावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी केली आहे.

Comments are closed.