इंग्लंडच्या मार्गदर्शकपदी केविन पीटरसनची नियुक्ती
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनची एकदिवसीय आणि टी-20 संघांच्या विशेष मार्गदर्शकपदी नियुक्ती केली आहे. ईसीबीने 2027च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळय़ासमोर ठेवून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीटरसन आता संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्येही तो इंग्लंड संघासोबत असेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर इंग्लंड मायदेशात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळेल. पुढील 12 महिन्यांत एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाला तयार करण्याची आणि रणनीती आखण्याची जबाबदारी पीटरसनवर असेल. न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि केविन पीटरसन त्याच्यासोबत मिळून काम करेल. मॅक्युलमव्यतिरिक्त इंग्लंडच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये मार्कस ट्रेस्कोथिक, टिम साउथी, सारा टेलर आणि जीतन पटेल यांचा समावेश आहे. पीटरसनने यापूर्वी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे.
Comments are closed.