64 चेंडूंत 173 धावा! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने लगावले 16 चौकार आणि 12 षटकार, ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड वाचला

सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये शेर ए पंजाब टी 20 लीगची अधिक चर्चा सुरू आहे. त्याला कारण भारताचे दोन स्टार खेळाडू. एक भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि दुसरा टी20 विश्वचषक विजेता अभिषेक शर्मा. आता मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने कहर केला आहे. त्याने मंगळवारी (8 ऑगस्ट) 64 चेंडूंत 16 चौकार आणि 12 षटकारांच्या सहाय्याने 173 धावा कुटल्या आहेत.

नेमका हा फलंदाज कोण? तर तो आहे नमन धीर. त्याने केलेल्या तुफानी खेळीमुळे त्याच्या संघाने 20 षटकांत 279 धावासंख्या उभारली आहे.

नमन पंजाबच्या टी20 लीगमध्ये अमृतसर सूरमाजचा कर्णधार आहे. त्याने सलामीला येत मोहाली किंग्जविरुद्ध ही विक्रमी खेळी केली आहे. या सामन्यात मोहालीचा कर्णधार रमनदीप सिंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला होता. अमृतसरने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर सहज धवन याची विकेट लवकरच गमावली. तो एक धाव करत आयुष गोयलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला राहुल कुमारही 13 धावा करत बाद झाला. त्याआधी त्याने नमनसोबत 19 चेंडूंत 47 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या टोकाकडून नमनने जबरदस्त फलंदाजी सुरूच ठेवली. त्याला जशनप्रीत सिंगने चांगली साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 51 चेंडूंत 120 धावांची भागीदारी केली.

नमनने त्याचे या सामन्यातील शतक केवळ 37 चेंडूंतच पूर्ण केले. त्याने 64 चेंडूंत 16 चौकार आणि 12 षटकारांच्या सहाय्याने 270.31 च्या स्ट्राईक रेटने 173 धावा केल्या.

टी20 क्रिकेटचा इतिहास पाहिला तर सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम दिग्गज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरिअर्स विरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. त्याचा हा विश्वविक्रम थोडक्यात वाचला आहे.

नमन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो
पंजाबच्या असणारा नमन आयपीएलमध्ये मात्र मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने 2024 मध्ये आयपीएल पदार्पण केले. तेव्हा त्याला केवळ सात सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो 2025 आणि 2026 हंगामही मुंबईकडूनच खेळला.

नमनने आतापर्यंत 37 आयपीएल सामने खेळले असून त्यामध्ये तीन अर्धशतकांच्या सहाय्याने 710 धावा केल्या. आता त्याची ही वादळी खेळी पाहता 2027 च्या आयपीएल हंगामात तो काय करेल याची प्रतीक्षा आहे. (Naman Dhir 173 Runs for Amritsar Soormas vs Mohali Kings in Sher-E-Punjab T20 League 2026 Chris Gayle Record remains intact)

Comments are closed.