दुलीप ट्रॉफी फायनल ड्रॉ झाल्यास विजेतेपद कोणाला? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात ईस्ट झोन आणि साऊथ झोन हे दोन्ही संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या ईस्ट झोन संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. ईस्ट झोन संघाने सुरूवातीचे दोन फलंदाजी करून 708 धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान इशान किशनने 270 धावांची खेळी केली. त्यामुळे ईस्ट झोन संघाला सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण जर हा सामना ड्रॉ झाला, तर जेतेपदाची ट्रॉफी कोणत्या संघाला मिळणार? बीसीसीआयचा नियम काय सांगतो?
या सामन्यात 709 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. सलामीला आलेला रिकी भुई 1 धाव करून माघारी परतल्यानंतर, नारायण जगदीशन आणि देवदत्त पडिक्कलने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जगदीशन 32 धावांवर माघारी परतला. तर देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळी करून धावसंख्येत भर घातली. 250 धावांवर साऊथ झोन संघाचे 5 फलंदाज माघारी परतले आहेत. अजूनही ईस्ट झोनचा 450 हून अधिक धावांनी पुढे आहे. त्यामुळे ईस्ट झोनची या सामन्यावर मजबूत पकड आहे.
या सामन्याचा निकाल लागणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला, तर पहिल्या डावात आघाडीवर असलेल्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंतिम सामना हा 5 दिवसांचा असतो. जर सामना ड्रॉ झाला, तर पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या संघाला विजेता घोषित केलं जातं. जर ईस्ट झोन आणि साऊथ झोन संघादरम्यान सुरू असलेल्या सामन्याची स्थिती पाहिली, तर ईस्ट झोनचा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. जर सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला, तरीदेखील ईस्ट झोनचा संघ विजय मिळवू शकतो. तसेच सामन्याचा निकाल लागला नाही, तर ईस्ट झोनचा संघ पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर जेतेपदाचा मानकरी ठरेल.
अंतिम सामन्यात ईस्ट झोन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ईस्ट झोन संघातील फलंदाजांनी योग्य ठरवला. अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. वैभवने 44 तर अभिमन्यूने 72 धावांची खेळी केली. त्यानंतर इशान किशनचं वादळ पाहायला मिळालं. इशानने 334 चेंडूंचा सामना केला आणि 270 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 30 चौकार आणि 7 षटकार खेचले. या दमदार खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने पहिल्या डावात 708 धावांचा डोंगर उभारला आहे.
Comments are closed.