बस किंवा रिक्षाचालकाने अवाजवी भाडे आकारल्यास ईमेलवर तक्रार करा, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात बस वाहतूकदार आणि रिक्षाचालकांनी अवाजवी भाडे आकारणी केली किंवा प्रवाशांसोबत उद्धट वर्तन केले तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमेल [email protected] वर वाहन आणि प्रवासाच्या तपशीलासह तक्रार करावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटना, पोलीस दल आणि परिवहन विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा आणि बस वाहतूकदारांना विविध सूचना देण्यात आल्या. रिक्षा चालकांनी रिक्षा स्टॅण्डवर वाहने शिस्तबद्ध पद्धतीने उभी करून वाहतूक कोंडी टाळावी. प्रवाशांसोबत उद्धट बोलू नये. वाहन क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करू नये. बस चालकांनी आपत्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत ठेवावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसच्या सुटण्याच्या वेळा निश्चित कराव्यात. चालक मद्य प्राशन करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवणार याची खबरदारी बसमालकांनी घ्यावी. तपासणीत चालक दोषी आढळल्यास चालक आणि मालक या दोघांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, अश्वनाथ खेडकर, उपनिरीक्षक संजय कांबळे उपस्थित होते.
Comments are closed.