भारत आणि बांगलादेश दरम्यान पुन्हा गाड्या धावणार आहेत.

ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो प्रवास

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत आणि बांगलादेशदरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान पुन्हा रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. यावेळी केवळ रेल्वेसेवा पुन्हा सुरू होणार नाही, तर नव्या मार्गांना जोडण्याची देखील तयारी असणार आहे. या रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाल्यास दोन्ही देशांच्या संबंधांमधील तणाव निवळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

भारत आणि बांगलादेश दरम्यान पुन्हा रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी दोन्ही देशांच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बैठकीला प्रारंभ केला आहे. या बैठकीत बांगलादेशच्या राजशाहीपासून कोलकात्यादरम्यान नवी रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

मैत्री एक्स्प्रेससाठी दुसरा मार्ग

मैत्री एक्स्प्रेस यापूर्वी जमुना ब्रिजच्या मार्गाने संचालित केली जात होती, आता ही रेल्वे बांगलादेश पद्मा ब्रिजवरून संचालित करण्यासाठी उत्सुकता दाखवत आहे. परंतु यासंबंधीचा अंतिम निर्णय दोन्ही देशांच्या सहमतीनंतरच घेतला जाणार आहे.

3 रेल्वे पुन्हा सुरू होणार

बैठकीत मिताली, मैत्री आणि बंधन एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली आहे. दोन्ही देश या रेल्वेफेऱ्या ऑक्टोबरपर्यंत पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.  या रेल्वेफेऱ्या जुलै 2024 मध्ये बांगलादेशात झालेल्या दंगली अन् सत्तांत्तरानंतर निर्माळा झालेल्या सुरक्षा कारणांमुळे बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता दोन्ही देश या रेल्वेफेऱ्या पुन्हा एकदा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

मालगाड्यांचे संचालन जारी

दोन्ही देशांदरम्यान मालगाडी सेवा कधीच बंद झाली नाही आणि सध्याही सुरळीतपणे सुरू आहे. तर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत वित्तीय व्यवस्थापन, थकबाकी, सीमापार धावणाऱ्या रेल्वेंची संख्या , वार्षिक लेखाजोखा, संचालन क्षमता, रेल्वेडबे आणि पायाभूत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

Comments are closed.