चाहत्यांची प्रतिक्षा संपली; BCCI ने केली संघाची घोषणा, हार्दिक पंड्या मैदानात उतरणार!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघात पुनरागमन करण्यासाठी त्याचा कसून सराव सुरू आहे. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून, लवकरच त्याचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन होणार आहे. BCCI ने ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध इंडिया-ए संघाची घोषणा केली असून हार्दिक पंड्याची या संघात निवड करण्यात आली आहे.

इंडिया-ए आणि ऑस्ट्रेलिया-ए या संघांमध्ये पुडुच्चेरी येथे दोन मल्टी-डे सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यातील सुरुवातीच्या दोन मल्टी-डे सामन्यांच्या मालिकेची धुरा देवदत्त पडिक्कलकडे सोपवण्यात आली असून, साई सुदर्शन उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान पहिला आणि 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान दुसरा मल्टी-डे सामना खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पंड्याला मल्टी-डे संघात स्थान मिळालेले नसून, तो 6, 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्याचे ऑस्ट्रेलिया-अ विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमधील खेळणे त्याच्या अंतिम फिटनेस रिपोर्टवर पूर्णपणे अवलंबून असेल. या मालिकेसाठी निवडलेल्या एकदिवसीय संघात प्रियांश आर्य, रजत पाटीदार, अर्शिन कुलकर्णी आणि प्रभसिमरन सिंह यांच्यासह अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दोन्ही संघांमधील हे सामने पुडुचेरीच्या मैदानावर पार पडणार असून, हार्दिकच्या तंदुरुस्तीकडे आणि कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.