Latur News – विमल खायला दिली नाही म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला, गळ्यावर कटरने वार; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विमल पुडी खायला का देत नाहीस, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट कटरने गळ्यावर वार करण्यापर्यंत झाल्याची धक्कादायक घटना अहमदपूर शहरातील बाजार लाईन मेन रोडवर 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अहमदपूर बाजार लाईन मेन रोडवरील स्वाती ज्वेलर्स दुकानाजवळ आरोपीने फिर्यादीच्या चुलत भावास “विमल पुडी खायला का देत नाहीस?” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाने मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने फळे कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरने गळ्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात सलिम बागवान गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. उपनिरिक्षक परशुराम देवकते हे या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या घटनेमुळे शहरातील बाजार परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या हल्ल्यात सलिम नबीसाब बागवान (वय 30) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शाकिर इलीयास बागवान (वय 26) यांच्या फिर्यादीवरून युनुस युसुफ बागवान याच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109(1), 115(2), 351(2)(3) अन्वये गुन्हा क्रमांक 593/2026 दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.