पडद्याआडून- ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’; श्रद्धा, कर्तव्य आणि माणुसकीचा रंगमंचीय पट

>> पराग खोत

पंढरपूर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो विठ्ठल, चंद्रभागा, टाळ-मृदंगाचा गजर आणि पंढरीची वारी. मात्र ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक या परिचित प्रतिमेच्या पलीकडे जाऊन पंढरीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करते. श्रद्धा, कर्तव्य, प्रेम, मातीशी असलेलं नातं आणि माणसाच्या मनातला संघर्ष या सगळ्यांची सांगड घालत हे नाटक रंगमंचावर येतं.

मयूर सारकाळे लेखक तर आशुतोष जरे यांनी सहलेखक तसेच दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन्स निर्मित या नाटकाचे रंगभूमीवर आगमन झाले आहे. नाटकाचा केंद्रबिंदू आहे ज्ञानेश्वर जगनाडे अर्थात माऊली; जो एक तरुण सैनिक आहे. देशासाठी लढण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि प्रसंगी बलिदान देण्याची तयारी आहे. त्याच्या मनात विठ्ठल आणि पंढरपूरविषयी एक खोलवर रुजलेला राग आहे. त्याचे वडील सैन्यात होते आणि त्यांचा मृत्यू विठ्ठलाच्या मंदिरात झाल्याने माऊलीने देवाशीच एक प्रकारचं वैर पत्करलं आहे. तो देवळात जात नाही, वारी करत नाही. याउलट त्याची नवविवाहित पत्नी सगुणा ही विठ्ठलाची निस्सीम भक्त. एका बाजूला सीमेवर देशासाठी लढणारा माऊली आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलाच्या वारीची आस असलेली सगुणा, या दोन टोकांमधून नाटक श्रद्धा आणि वास्तव यांच्यातला संवाद उभा करतं. पंढरीच्या वारीचं सगुणाचं स्वप्न आणि सियाचीनच्या बर्फाळ प्रदेशातील माऊलीचं कर्तव्य या दोन समांतर वाटा अखेरीस मानवी भावविश्वात येऊन एकमेकांना मिळतात.

नाटकाचं वैशिष्ट्य असं की ते केवळ ‘विठ्ठलभक्ती’चं नाटक नाही. देवावर श्रद्धा असावी की नसावी, देव या संकल्पनेकडे प्रत्येक माणूस आपल्या अनुभवातून कसा पाहतो, हा अधिक व्यापक प्रश्न त्यातून पुढे येतो. म्हणूनच पंढरीची वाट ही केवळ मंदिरापर्यंत पोहोचणारी वाट राहत नाही; ती माणसाच्या अंतर्मनात जाणारी वाट बनते. ‘पंढरीची वाट संपत नाही… ती प्रत्येक पावलागणिक नव्याने सुरू होते’ ही नाटकाची मध्यवर्ती भावना याच अर्थाने महत्त्वाची ठरते. याच कथानकाला समांतर जाणारी पंढरपुरातल्या एकमेव वासुदेवाची आणि त्याच्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात नोकरी करू पाहणाऱ्या मुलाची अजून एक गोष्ट नाटकात आहे. पंढरपुरात राहणारी आणि त्याच्याशी घट्ट नाळ जोडलेली पिढी आणि तिथून बाहेर पडून आपला उत्कर्ष साधू पाहणारी पुढची पिढी या दोघांमधील संघर्ष दाखविणारे हे नाटक आहे.

ज्ञानेश्वर पंढरपूरहून निघतो आणि सियाचीनला पोहोचतो. तिथे कर्तव्य बजावत असताना एका मोठ्या अडचणीत सापडतो. तो या जीवघेण्या अडचणीतून बाहेर पडतो का? कसा? हे नाटकाचे सूत्र आहे. त्याला तिथे ‘सर्वार्थाने’ मदत करणारा नामदेव सिंग रंधावा हा त्याचा शीख सहकारी नाटकाचा हायलाईट आहे. नाटकात पंढरीचा भाग प्रेक्षकांच्या भावनेला हात घालणारा असला तरी सियाचीनमधला भाग विशेष लक्षवेधी झाला आहे. नेपथ्य आणि प्रकाशयोजनेच्या साहाय्याने बर्फाळ सीमाभागाचा थरार आणि तिथलं कठोर वास्तव रंगमंचावर उभं करण्यात आलं आहे. पंढरपूरच्या मातीतला भावनिक उबदारपणा आणि सियाचीनच्या गोठवून टाकणाऱ्या वातावरणातील तफावत नाटकाला दृश्यात्मक परिमाण देते. नाटकाच्या नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना या तीन घटकांनी चोख कामगिरी बजावली आहे.

रोहित मानेने माऊलीची भूमिका समर्थपणे पेलली आहे. विनोदी भूमिकांमुळे परिचित असलेल्या या कलाकाराचा रंगभूमीवरील हा वेगळा आविष्कार उल्लेखनीय आहे. माऊलीच्या मनातला देवाविषयीचा राग, सैनिक म्हणून असलेलं कर्तव्य आणि पती म्हणून असलेली भावनिक ओढ या तिन्ही पातळ्यांवर त्याने ही व्यक्तिरेखा उभी केली आहे.

नाटकाचा आणखी एक वेगळा पदर म्हणजे पंढरपूरच्या धार्मिक ओळखीपलीकडे तिथल्या माणसांकडे पाहण्याचा प्रयत्न. वारीच्या काळात लाखो भाविक पंढरीत येतात; पण त्या भाविकांच्या गर्दीच्या पलीकडे वर्षभर जगणाऱ्या पंढरपूरकरांच्या आयुष्यात काय घडतं, त्यांच्या समस्या काय आहेत, याचा धागाही नाटक पकडतं. वासुदेवासारख्या लोप पावत चाललेल्या लोकपरंपरेला दिलेला संदर्भही नाटकाला सामाजिक-सांस्कृतिक परिमाण देतो.

मात्र आशय समृद्ध असला तरी नाटकाची गती संथ झाली आहे. भावनिक प्रसंगांची लांबी वाढल्याने काही ठिकाणी कथानकाचा मूळ धागा सैलावतो. संवाद थोडे आटोपशीर करून प्रसंगांमध्ये अधिक कृती आणि रंगमंचीय हालचाल आणली असती, तर नाटकाचा परिणाम अधिक तीव्र झाला असता. विशेषतः भावनिक प्रसंगांमध्ये ‘सांगण्यापेक्षा दाखवणे’ या रंगभूमीच्या मूलभूत तत्त्वाचा अधिक वापर झाल्यास नाटकाची परिणामकारकता वाढू शकते.

तरीही ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची खरी ताकद त्याच्या हेतूत आहे. विठ्ठलाच्या नावाने सुरू झालेला हा प्रवास शेवटी माणसापर्यंत पोहोचतो. देवळाच्या गाभाऱ्यातला विठ्ठल आणि सीमेवर देशाचं रक्षण करणारा सैनिक या दोन प्रतिमांमध्ये नाटक एक सुंदर भावबंध शोधतं. श्रद्धा ही केवळ देवापर्यंत पोहोचण्याची गोष्ट नसून, ती माणसाला माणसाशी जोडते, हा आशय नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. ही केवळ पंढरपूरची कथा नाही; ती प्रत्येकाच्या मनात सुरू असलेल्या एका प्रवासाची गोष्ट आहे. मुक्काम पंढरपूर असला, तरी शोध मात्र माणसाचा आहे आणि म्हणूनच या नाटकाची वाटचाल लक्षात राहते.

  • लेखक: मयूर सारकाळे आणि आशुतोष जरे

  • दिग्दर्शक: आशुतोष जरे

  • कलाकार: योगेश चिकटगावकर, सानिका रेणुके, बिपिन घोबाळे, अमोल ताटे, संजीवनी पाटील आणि रोहित माने

  • बॅकस्टेज: संदेश बेंद्रे

  • प्रकाश: अमोघ फडके

  • संगीत: अजित परब / योगेश चिकटगावकर

  • निर्माता: डॉ. उमेश आजगावकर, नितीन वैद्य, सचिन अवस्थी, स्वाती दिवे मुखर्जी

  • सूत्रधार: नितीन नाईक

Comments are closed.