नागपुरात संघ कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा मनुस्मृतीची प्रत जाळून केला निषेध
संविधान सन्मान यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी नागपुरातील संघ कार्यालयावर मोर्चा काढला; मात्र पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना वाटेतच रोखून धरले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ‘मनुस्मृती नव्हे, संविधान स्वीकारा’ अशी घोषणाबाजी करीत मनुस्मृतीची प्रत जाळून निषेध केला.
उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत घडलेल्या कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संविधानाच्या मूल्यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसने नागपुरात ‘संविधान सन्मान यात्रा’ काढली. संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागतील कार्यालयाकडे निघालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या झटापटीत युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांचा गळा आवळला गेला. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. त्यांनी लागलीच उपचारार्थ सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नंदनवन पोलीस ठाण्यात ठिय्या
मोर्चादरम्यान शिवराज मोरे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱयांनी धक्काबुक्की व मारहाण केली. हेल्मेट घातलेल्या एक-दोन अज्ञात पोलिसांनी मोरे यांचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलिसांच्या गाडय़ा अडवल्या
पोलिसांनी शिवराज मोरे, खा. श्यामपुमार बर्वे, , प्रवत्ते अतुल लोंढे, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेत बळाचा वापर करून पोलीस वाहनात बसविले. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स आणि गाडय़ांवर चढून त्या अडविल्या. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Comments are closed.