न्यायालयासमोर सर्वजण समान आहेत.

राहुल गांधी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

न्यायासनासमोर सर्वजण समान आहेत, अशी टिप्पणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्याविरोधात सादर करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भात एक अपिल याचिका केली आहे. तिची सुनावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी करणाऱ्या वकीलांना उद्देशून ही टिप्पणी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशात एक बदनामी प्रकरण सादर करण्यात आले आहे. गांधी यांनी काही काळापूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या संदर्भात हे प्रकरण आहे. त्या प्रकरणात तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोधात राहुल गांधी यांनी ही अपिल याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणात गेले सहा महिने सुनावणी झालेली नाही, अशी तक्रार या प्रकरणाशी संबंधित एका पक्षकाराचे वकील गौरव भाटिया यांनी केली.  सर्वोच्च न्यायालयाचे नोंदणी कार्यालय हे प्रकरण कार्यक्रम तालिकेवर लवकर येऊ देत नाही. राहुल गांधी यांनी या प्रकरणात स्थगिती आदेश मिळविला आहे. त्यामुळे त्यांना प्रकरण लांबविण्यात रस असल्याचे दिसते. त्यामुळे न्यायालयाने स्वत: लक्ष घालून हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीसाठी घ्यावे, असे या वकीलांचे म्हणणे होते. तथापि, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने ही मागणी नाकारताना, योग्य प्रक्रियेचा अवलंब करावा, अशी सूचना केली. न्यायासनासमोर सर्व समानच असतात. त्यामुळे कोणी मोठा नेता असला तरी त्याला योग्य न्यायालयीन प्रक्रिया आचरणात आणावी लागते. याचिका लवकर सुनावणीसाठी यावी असे वाटत असेल, तर आपण प्रथम तसे आवेदन पत्र नोंदणी कार्यालयाकडे सादर करावे. नंतर आपल्या मागणीचा विचार करता येईल. राहुल गांधी यांनी केलेल्या एका वादग्रस्त भाषणासंदर्भात हे प्रकरण आहे. 4 ऑगस्ट 2025 या दिवशी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले होते. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणात पुढील कारवाई पुढील आदेश येईपर्यंत करु नये, असा स्थगिती आदेश दिला होता. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ते लवकर सुनावणीसाठी यावे, अशी मूळ तक्रारदाराने मागणी केली आहे.

Comments are closed.