मृतदेहांवर राजकारण करू नका!
संगरूर आत्महत्येप्रकरणी भगवंत मान अन् राहुल गांधी आमने-सामने
वृत्तसंस्था, संगरूर
पंजाबच्या संगरूरमध्ये गुलजार सिंह यांच्या मृत्यूचे प्रकरण आता राजकीय लढाईत रुपांतरित झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवरून आप सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित पेले, तसेच राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच्या प्रत्युत्तरादाखल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राहुल यांच्यावर ‘मृतदेहांवर गलिच्छ राजकारण’ करण्याचा आरोप केला. तर आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये अमली पदार्थांची समस्या ही जुन्या सरकारांची देणगी असल्याचा दावा केला.
संगरुर येथील तूर बंजारा गावात गुलजार सिंह यांनी एका कार्यक्रमात गावात उघडपणे होत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित केला होता. माझा मुलगा ‘चिट्टा’च्या आहारी गेला असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर गावातील काही लोकांनी गुलजार यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकला होता. यामुळे दुखावले गेलेल्या गुलजार सिंह यांनी आत्महत्या केली होती. पोलिसांनी त्यांच्या पुत्राने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदविला आहे. एफआयआरमध्ये गावाच्या सरपंच बलजिंदर कौर, त्यांचे पती बलजीत सिंह समवेत 5 जणांची नावे आहेत. या सर्वांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, छळ आणि एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच एफआयआरमध्ये हरपाल सिंह चीमा यांचे नाव नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान गुलजार यांच्या मृत्यूपूर्वी समोर आलेले व्हिडिओ तपासले जात आहेत.
राहुल गांधींकडून लक्ष्य
गुलजार यांनी सरकारच्या अपयशावर प्रश्न उपस्थित केले होते आणि याचमुळे त्यांना धमकाविण्यात आले होते. सरकारच्या अपयशावर प्रश्न उपस्थित केल्यास धमकी अन् अत्याचाराने उत्तर मिळाले आहे. हा पंजाबमधील एका धोकादायक पॅटर्न असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी हरपाल सिंह चीमा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी स्वतंत्र अन् निष्पक्ष चौकशी करण्यात यावी असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भगवंत मान यांचे प्रत्युत्तर
पंजाबचे लोक ‘मृतदेहांवरील गलिच्छ राजकारण’ पसंत करत नाहीत. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. राहुल गांधी यांनी प्रकरणाची पूर्ण माहिती नसताना आरोप करू नयेत असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहे.
केजरीवालांनी घेतली उडी
पंजाबमध्ये नशेच्या विरोधात लढाई सुरू आहे. पंजाबमधील नशेच्या समस्येसाठी काँग्रेस, अकाली दल आणि भाजपचे मागील सरकार जबाबदार असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने याप्रकरणी पंजाब सरकारकडून अहवाल मागविला आहे. आयोगाने अध्यक्ष 10 सप्टेंबर रोजी संगरूरचा दौरा करणार आहेत. याचदरम्यान काँग्रेसने चंदीगडमध्ये निदर्शने करत हरपाल सिंह चीमा यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
Comments are closed.