हिंदुस्थानचा तैवानवर गोलवर्षाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गतविजेत्या हिंदुस्थानी मुलांच्या हॉकी संघाने चायनीज तैपेईचा 15-0 गोलफरकाने धुव्वा उडवून ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. ‘अ’ गटातील अखेरच्या सामन्यातील दणदणीत विजयासह हिंदुस्थानने अव्वल स्थानासह आगेकूच केली. कर्णधार अनमोल एक्का याने पेनल्टी कॉर्नरचे अचूक भांडवल करत तब्बल सहा गोल झळकावले.

पहिल्या क्वार्टरमध्ये चायनीज तैपेईच्या बचावफळीने हिंदुस्थानला रोखून धरले. मात्र,त्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी आक्रमणाची धार अशी वाढवली की, प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये आर्यन एक्सेस, प्रभदीप सिंग आणि गुरसेवक सिंग यांनी अवघ्या पाच मिनिटांत तीन गोल करत सामन्याची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर अनमोलने दोन, तर अर्जुन संतोष हर्गुडेने एक गोल करत मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानला 6-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अनमोलने पेनल्टी का@र्नरवर अक्षरशः वर्चस्व गाजवत सलग गोल केले आणि आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर चौथा गोलही त्याच्याच स्टिकमधून आला. 35व्या मिनिटाला अजित यादवने गोल केला, तर 45 व्या मिनिटाला अनमोलने पाचवा गोल करत हिंदुस्थानची आघाडी 10-0 वर नेली. शेवटच्या क्वार्टरमध्ये हरपालने दोन गोल ठोकले. अनमोलने आणखी एक गोल करत वैयक्तिक गोलसंख्या सहावर नेली, तर आर्यन एक्सेसने आणखी दोन गोल करत हिंदुस्थानच्या विजयावर 15-0 अशी दणदणीत मोहोर उमटवली.

15-0 ने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक, हिंदुस्थान 10 गुणांसह गटात अव्वल

या धडाकेबाज विजयासह पाच वेळचा विजेत्या हिंदुस्थानी संघाने 10 गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळविले. हिंदुस्थानने तीन सामने जिंकले, तर एका सामन्यात बरोबरी साधली. दक्षिण कोरियाने नऊ गुणांसह दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली. जपान, इंडोनेशिया आणि चायनीज तैपेई यांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले असून आता त्यांना क्रमवारीसाठीच्या सामन्यांवर समाधान मानावे लागणार आहे.

Comments are closed.