Ratnagiri News – गणेशोत्सवाच्या तोंडावर चिपळूण बाजारपेठेतील अतिक्रमणावर धडक कारवाई, 3 ट्रॉली साहित्य व 8 हातगाड्या जप्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेने बाजारपेठेतील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात बुधवारी धडक कारवाई केली. नगरपालिका ते गांधी चौक, बाजारपूल या मार्गावर गटारीवर तसेच गटारीबाहेर रस्त्यालगत नियमबाह्य पद्धतीने व्यापार करणाऱ्या सुमारे २० ते २५ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पालिकेच्या पथकाने तीन ट्रॉली साहित्य आणि आठ हातगाड्या जप्त केल्या.
चिपळूण बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी गटारावर तसेच गटाराच्या पुढे रस्त्याकडेला स्टॅण्ड, टेबल, हातगाड्या लावून व्यापार सुरू केला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच बाजारपेठेत वाहनांना उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. परिणामी ग्राहक बाजारपेठे ऐवजी काविळतळी, बहादूरशेख नाका परिसराकडे खरेदीसाठी वळत असल्याने नियमात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही त्याचा परिणाम होत होता. या संदर्भात व्यापारी, नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून नगरपालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नगरपरिषदेच्या बैठकीतही या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर पाच कर्मचाऱ्यांचे अतिक्रमणविरोधी पथक स्थापन करून सातत्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारवाईपूर्वी संबंधित व्यापाऱ्यांना तीन वेळा साहित्य आत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईचा बडगा उगारला. गटारीवर ठेवण्यात आलेले स्टॅण्ड, टेबल तसेच हातगाड्या जप्त करण्यात आल्या. मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली संदेश टोपरे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. तथा या कारवाईमुळे नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पालिकेने सातत्याने अशी कारवाई केल्यास बाजारपेठेतील अतिक्रमणाला आळा बसेल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल, अशी अपेक्षा व्यापारी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे सणाच्या काळात बाजारपेठेत वाढणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Comments are closed.