गँगस्टर अबू सालेमला 'सर्वोच्च' झटका

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची याचिका न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका महत्त्वपूर्ण निर्णयात 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली. 27 जुलै रोजीच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने अबू सालेमच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. शिक्षेतील सवलतीचा विचार करता शिक्षेची 25 वर्षे आधीच पूर्ण झाल्याने आपली सुटका व्हायला हवी, असा युक्तिवाद अबू सालेमने केला होता.

तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने सालेमची याचिका मुदतपूर्व आणि गैरसमजावर आधारित असल्याचे सांगून फेटाळली. अबू सालेमने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये अबू सालेमची याचिका फेटाळली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 मोठे बॉम्बस्फोट होऊन 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घातपातात 700 हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणात 2005 मध्ये अबू सालेमला पोर्तुगालमधून प्रत्यार्पित करण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोटांमधील सहभागाबद्दल न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Comments are closed.