लालूंच्या कुटुंबीयांवर आरोप निश्चित करणे
आयआरसीटीसी हॉटेल प्रकरण : लालू, राबडी, तेजस्वी यांच्यासह 9 जणांवर ठपका ; 7 आरोपी निर्दोष,न्यायालयाचे निविदा फेरफारावर महत्त्वपूर्ण विधान,पुढील सुनावणीसाठी 3 ऑक्टोबर तारीख निश्चित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयआरसीटीसी हॉटेल मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने लालूप्रसाद यादव, पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी यादव, सरला गुप्ता, लारा प्रोजेक्ट्स आणि सुजाता हॉटेल यांच्यासह नऊ आरोपींवर आरोप निश्चित केले आहेत. याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 3 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने याच प्रकरणात इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दिल्ली न्यायालयाने आयआरसीटीसी हॉटेल मनी लाँड्रिंग प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. न्यायालयाने माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात राबडी देवी, तेजस्वी यादव आणि लारा प्रोजेक्ट्स हे देखील आरोपी आहेत. न्यायालयाने पी. सी. गुप्ता, विजय कोचर आणि विनय कोचर यांच्यावरही आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
लालूप्रसाद यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा तीव्र संशय न्यायालयाने व्यक्त केला आहे. हे प्रकरण त्यांच्या रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. न्यायालयाच्या मते, रेल्वे अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेत फेरफार केला होता. या फेरफारामुळे रांची आणि पुरीतील हॉटेल्स भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
सात आरोपींची निर्दोष मुक्तता
न्यायालयाने गौरव गुप्ता, नाथ मल काकरानिया, राहुल यादव, विजय त्रिपाठी, देवकी नंदन तुलस्यान, राजीव कुमार रेलन आणि मे. अभिषेक फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात या आरोपींविरुद्ध कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही. आता या प्रकरणात आरोप असलेल्या सर्व आरोपींना 3 ऑक्टोबर रोजी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
आयआरसीटीसी हॉटेल प्रकरण
हे प्रकरण रांची आणि पुरी येथील दोन आयआरसीटीसी हॉटेल्स चालवण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्याशी संबंधित आहे. निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या बदल्यात जमिनीचा सौदा करण्यात आला आणि या जमिनीचा संबंध गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशांशी जोडला गेला आहे, असा आरोप आहे. याच्या आधारे, अंमलबजावणी संचालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता, राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने नऊ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केल्यानंतर खटल्याच्या सुनावणीचा पुढील टप्पा सुरू होईल.
Comments are closed.