पाच जणांना लाखोंचा गंडा, नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूचा पर्दाफाश
पंधरा कोटींच्या नोटांचा पाऊस पाडतो, असे आमिष दाखवून कळवणच्या पिंपळे खुर्द येथील भोंदू हिराचंद बर्डेने मुंबईतील पाचजणांना लाखोंचा गंडा घातला. संबंधितांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. त्यानंतर या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. अभोणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याच्यासह तिघांना अटक केली.
बोरिवली येथील राजाराम शेलार यांची काही मित्रांनी कळवण तालुक्यातील हिराचंद बर्डेशी ओळख करून दिली. त्याला काही रक्कम दिली तर तो मंत्र-तंत्राच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगितले. शेलार व चार मित्रांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिले असता त्याने दोन लाख केल्याचे भासवले. या मित्रांचा विश्वास संपादित केल्यानंतर बर्डेने अकरा लाख दिल्यास त्याचे पंधरा कोटी करून देईन, असे आमिष दाखवले. संबंधितांनी वेळोवेळी ऑनलाइन व रोख असे साडेदहा लाख रुपये सोपवले. त्यानंतर त्याने पैसे भरलेली गोणी शेलार व मित्रांना दिली. सात दिवस पूजा करा, त्याआधी गोणी उघडल्यास कोप होईल, अशी भीती मनात भरली. दरम्यान, एका नातेवाईकाच्या निधनामुळे या मित्रांनी गोणीची पूजा केली नव्हती. हे कळताच भोंदूने गोणी अशुद्ध झाली असून शुद्धीकरणासाठी घेऊन येण्यास सांगितले, पैशांचीही मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पाचजणांनी ‘अंनिस’शी संपर्क केला. राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने अभोणा पोलीस ठाणे गाठून शेलार यांनी फिर्याद दिली. त्यावरून जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली.
Comments are closed.