ठाण्यातील 28 हजार विद्यार्थी बनले ड्रग्जविरोधी दूत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तरुण पिढीला व्यसनापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ठाणे पोलिसांनी अमलीपदार्थ मुक्ती मोहीम सुरू केली आहे. या अभियानात तब्बल १७१ शाळांनी सहभाग घेतला असून जवळपास २८ हजार विद्यार्थी ड्रग्जविरोधी दूत बनले आहेत. ‘ड्रग्जला नकार, जीवनाला होकार’ हा अमली पदार्थांच्या विरोधात संदेश यावेळी देण्यात आला.

अमली पदार्थांविरोधातील लढाई आता विद्यार्थ्यांच्या मदतीने राबवली जात आहे. ठाणे शहर पोलिसांच्या या मोहिमेत नौपाडा, ठाणेनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि शीळ-डायघर परिसरातील शाळांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ व्यसनाचे दुष्परिणाम सांगून थांबवण्याऐवजी त्यांना व्यसनविरोधी संदेशाचे दूत बनवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. ‘नशामुक्त हिंदुस्थान – नशामुक्त ठाणे’ हे उद्दिष्ट समोर ठेवून युवकांनी व्यसनाऐवजी शिक्षण, खेळ, कला आणि कौशल्याला पसंती द्यावी, असा संदेश यावेळी ठाणे पोलिसांनी दिला. या अभियानात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुधे आणि पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियावर कलाकृती

व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना पोलिसांनी पारंपरिक भाषणांऐवजी क्रिएटिव्ह कॅम्पेनचा फंडा वापरला आहे. ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान रील, कविता, पोस्टर अन् पथनाट्य अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरणांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून निवडक कलाकृती सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जाणार आहेत.

कलाकारांनी दिला संदेश

अभिनेते मकरंद अनासपुरे, विजू माने, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. आयुष्यात ‘किक’ हवी असेल तर ती नशेत नव्हे तर ध्येय गाठण्यात असावी, असा संदेश या कलाकारांनी दिला.

Comments are closed.