‘द पॅराडाइज’चा ट्रेलर रिलीज होणार नाही, नानीचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तेलुगु सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता नानीचा चित्रपट ‘द पॅराडाइज’ 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, रिलीजच्या अगदी तोंडावर असूनही या चित्रपटाबाबत काही मोठे आणि अनपेक्षित निर्णय घेण्यात आले आहेत.

हैदराबादमधील एका मुलाखतीत बोलताना नानी याने स्पष्ट केले की, ‘द पॅराडाइज’चा कोणताच अधिकृत ट्रेलर रिलीज केला जाणार नाही. चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन आणि अंतिम काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक श्रीकांत ओडेला आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर पूर्णपणे व्यस्त आहेत. जर ट्रेलर बनवायचा ठरवला असता तर त्यात 4 ते 5 दिवसाचा वेळ वाया गेला असता आणि त्याचा थेट परिणाम मुख्य चित्रपटाच्या कामावर झाला असता. त्यामुळे संपूर्ण टीमने ट्रेलर न काढण्याचा मार्ग निवडला आहे. नानीच्या मते, हा निर्णय कोणत्याही अतिआत्मविश्वासातून घेतलेला नसून प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा चित्रपट वेळेत देण्यासाठी घेतला गेला आहे.

याशिवाय, या चित्रपटाला पॅन-इंडिया चित्रपट म्हणून प्रमोट करण्यास नानीने ठाम नकार दिला आहे. हा प्रामुख्याने तेलुगु भाषेतील चित्रपट असून तेलुगु प्रेक्षक हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहेत. चित्रपट इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार असला, तरी त्याला उगीचच पॅन-इंडियाचे लेबल लावून भव्य प्रमोशन करायचे नाही, असे नानीने स्पष्ट केले आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगताना नानीने स्पष्ट केले की, हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि हिंसेने भरलेला दिसत असला तरी या चित्रपटाचा खरा गाभा हा आई आणि मुलाच्या भावूक नातेसंबंधावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले आहे. या चित्रपटात नानीसोबत कायाडू लोहार, सोनाली कुलकर्णी , राघव जुयाल, आणि मोहन बाबू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Comments are closed.