बांधकामाचा स्लॅब भरत असताना विजेचा धक्का, दोन कामगारांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंबाजोगाई शहरातील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून दोन कामगारांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना आज १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपती लक्ष्मी आगमनाचे सणासुदीच्या दिवसात अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ पसरली आहे.

आपली व आपल्या कुटुंबियाची पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचे रान करून काबाड कष्ट करणार्‍या बांधकाम कामगार मजूर खंडू (यशवंत) कोंडीराम वाघमारे (३३, रा. मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (५०, रा.मंगळवार पेठ, चांभार गल्ली, अंबाजोगाई) अशी मृत कामगारांची नावे आहेत.

डबा घेऊन कामावर निघाले, अन काळाने गाठले

‘कामावर जातो’ असे सांगून घरातून आनंदाने डबा घेऊन निघालेल्या या मजुरांवर अचानक काळाने झडप घातली. मृत खंडू वाघमारे यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले होते. तर बबन वाघमारे हे मूळचे ड्रायव्हर म्हणून काम करत. मात्र, वाढत्या महागाईत कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाल्याने ते सुट्टीच्या दिवशी सेंटरिंगचे काम करत असत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. कुटुंबातील कमावत्या कर्त्या पुरुषांचा असा अचानक अंत झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिसे यांच्या इमारतीचे काम सुरू असून गुत्तेदार अश्रूबा (अशोक) वाघमारे यांच्याकडे हे मजूर कामावर होते. ज्या ठिकाणी काँक्रीट मिक्सरद्वारे काम सुरू होते, तिथूनच दोन मुख्य विद्युत वाहिन्या गेल्याची पूर्वकल्पना होती असे असतानाही सुरक्षेची योग्य खबरदारी न घेता काम सुरू ठेवण्यात आल्याने हा भीषण अपघात घडल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घटनेचे वृत्त समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात पोहोचून एकच आक्रोश केला.

दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन कामगारांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एकाच्या छातीला तर दुसर्‍याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मशीनचा ऑपरेटर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. महालक्ष्मी गणपती सारख्या सणासुदीच्या उत्सवात ही दुर्देवी घटना घडल्याने अंबाजोगाई शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.