जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएचे छापे
पाकिस्तानी सूत्रधारांसह ‘ओजीडब्ल्यू’ नेटवर्कचा तपास तीव्र
वृत्तसंस्था/ श्रीनगर
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम, बांदीपोरा आणि बारामुल्ला जिह्यांतील सात ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. एका कथित सीमापार दहशतवादी कटाच्या तपासाचा हा एक भाग आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी सूत्रधार आणि त्यांचे स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) नेटवर्क यांच्यातील कथित संबंधांच्या तपासाचा हा एक भाग आहे. या शोध मोहिमेदरम्यान स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनीही एनआयएच्या पथकांना मदत केली. ही संस्था आता आर्थिक व्यवहार, संवाद माध्यमे, शस्त्रास्त्रांचे स्रोत आणि दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या स्थानिक रसद पुरवठ्याचा तपास करत आहे.
एनआयएने शनिवारी सकाळी काश्मीरमधील सात ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. कुलगाम जिह्यात दोन, बांदीपोरामध्ये तीन आणि बारामुल्लाच्या सोपोरमध्ये दोन ठिकाणी शोध घेण्यात आला. ही शोधमोहीम जकुरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका प्रकरणाशी संबंधित आहे. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी एनआयएने एका संबंधित प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, कुपवाडा, अनंतनाग, पुलवामा आणि बडगाम येथील 10 ठिकाणी शोधमोहीम राबवली होती.
आतापर्यंतच्या तपासात पाकिस्तानस्थित सूत्रधार आणि स्थानिक साथीदारांमधील कथित संबंध उघड झाले आहेत. या नेटवर्कचा वापर दहशतवाद्यांचे दळणवळण, रसद, हालचालींना मदत करणे, आश्रय देणे, हेरगिरी आणि इतर प्रकारच्या समर्थनासाठी केला जात होता. संपूर्ण नेटवर्क आणि त्याच्या कारवायांची व्याप्ती उलगडण्यासाठी आर्थिक व्यवहार, दळणवळण माध्यमे, आरोपींच्या हालचाली आणि शस्त्रs व स्फोटकांच्या स्रोतांची देखील तपासणी केली जात आहे.
सीमारेषेवर अधिक सतर्कता
गुप्तचर विभागाने दिलेल्या इनपुट्सनंतर सुरक्षा यंत्रणा आता ऑनलाईन हालचाली, दहशतवाद्यांची भरती प्रक्रिया आणि शस्त्र वाहतुकीशी संबंधित नेटवर्कवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय लष्करासह स्थानिक पोलीस दल आता सतर्क झाले असून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त मोहिमा राबविल्या जात आहेत. तसेच पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवरील जवानांना अधिक सतर्क करण्यात आले आहे.
Comments are closed.