न धमकीला घाबरणार, न दबावाखाली करणार आत्मसमर्पण; हिंदुस्थानातून इराणचा अमेरिकेला कडक संदेश
हिंदुस्थानात आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. इराण कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरणार नाही आणि अमेरिका किंवा इस्रायलच्या दबावाखाली कधीही आत्मसमर्पण करणार नाही, असा कडक संदेश त्यांनी दिला आहे. पेजेश्कियान यांनी अमेरिकेचे इराणच्या परमाणु कार्यक्रमावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांनी आरोप केला की, अमेरिका आणि इस्रायल इराणच्या सैन्याचा थेट आणि शौर्याने सामना करण्याऐवजी भ्याडपणे सामान्य नागरिकांच्या मूलभूत पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत. इराणच्या जनतेला पाणी, अन्न, औषधे आणि रोजगाराच्या साधनांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इराणच्या परमाणु कार्यक्रमाबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, आमचा परमाणु कार्यक्रम नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांच्या आणि न्यूक्लियर नॉन-प्रोलिफरेशन ट्रीटीच्या चौकटीतच राहिला आहे. तरीही अमेरिका आणि इस्रायल आमच्यावर सैन्यात्मक कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे बहाणे शोधत आहेत.
इराण नेहमीच अणु मुद्द्यावर कायदेशीर चर्चेसाठी तयार राहिला आहे, परंतु अमेरिकेसोबत थेट चर्चेची सध्या कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाची मोठी दरी निर्माण झाली आहे. याच मंचावरून पेजेश्कियान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की, जो देश NPT चा सदस्य नाही, त्या इस्रायलच्या अण्वस्त्रांची आणि त्यांच्या परमाणु कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही चौकशी का केली जात नाही? अमेरिकेने जर खरोखरच शांतता हवी असेल, तर त्यांनी आधी इराणवरील सर्व निर्बंध मागे घ्यावेत आणि अन्यायकारक हल्ले थांबवावेत, अशी भूमिका इराणने मांडली आहे.
Comments are closed.