अमेरिकेत भारतीय महिलेची हत्या

विवाहास नकार दिल्याने युवकाने झाडली गोळी

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात भारतीय वंशाच्या 38 वर्षीय शालिनी ठाकूर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने सॅक्रामेंटोमध्ये एका रेस्टॉरंटबाहेर शालिनीचा पाठलाग करत तिच्यावर गोळी झाडली. आरोपीचे नाव रोहित असून तो 22 वर्षांचा आहे. पोलिसांनी चहुबाजूने घेतल्यावर रोहितने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.

रोहित सुमारे एक वर्षापासून शालिनीचा पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता. तो शालिनीसोबत विवाह करू इच्छित होता. परंतु शालिनीने वयात मोठे अंतर असल्याचे सांगत नकार दिला होता. यामुळे रोहित नाराज झाला होता. शालिनी आर्डन आर्केड भागात एका शॉपिंग प्लाझामध्ये काम करायची. कामावर जाताना रोहितने तिला एका रेस्टॉरंटबाहेर रोखले, शालिनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथून पळू लागली, परंतु रोहितने तिचा पाठलाग करत तिच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी काही वेळताच रोहितच्या गाडीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यावर रोहितने स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे.

जानेवारीपासून करत होता पाठलाग

रोहित जानेवारी महिन्यापासून शालिनीचा पाठलाग करत होता. तो अनेकदा मदत करण्याच्या निमित्तासाठी शालिनीच्या कारच्या टायरमधील हवा सोडत होता. एकदा त्याने शालिनीच्या अपार्टमेंटच्या चावीची डुप्लिकेट मिळविली होती, यानंतर तो कधीही तिच्या घरात शिरत होता. शालिनीने मे महिन्यात रोहितच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. न्यायालयाने रोहितला इशारा देखील दिला होता.

अमेरिकेत अवैध वास्तव्य

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानुसार रोहित वैध दस्तऐवजांशिवाय अमेरिकेत वास्तव्य करत होता. 2023 मध्ये एरिझोनाच्या मार्गे अमेरिकेत दाखल झाल्यावर त्याला गस्त पथकाने अटक केली होती. यानंतर बिडेन प्रशासनाच्या काळात त्याची मुक्तता करण्यात आली होती.

Comments are closed.