आशियाई क्रीडा स्पर्धेचा वेध – पाच नवे शिलेदार कौशल्य पणाला लावणार!

आशियाई क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम १९ सप्टेंबरपासून जपानमधील आयची नागोया येथे रंगणार आहे. हिंदुस्थानचे तब्बल ५०३ खेळाडू ३५ क्रीडा प्रकारांत पदकासाठी मैदानात उतरणार आहेत. या पथकात अनेक अनुभवी खेळाडू असले, तरी रोहित यादव, सुरुची फोगाट, साक्षी चौधरी, सुजित कलकल आणि आयुष शेट्टी या पाच युवा चेहऱ्यांसाठी आशियाई स्पर्धेचा मंच नवा असेल. मात्र, या सर्व प्रतिभावान खेळाडूंनी आव्हानाला भिडण्याची पक्की तयारी केली आहे. अनुभवी खेळाडूंच्या साथीला या नव्या दमाच्या खेळाडूंनीही जोर लावला, तर हिंदुस्थानच्या पदकतालिकेत यंदा आणखी एक नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो.

रोहित यादव – नीरजची उणीव भरून काढणार?

नीरज चोप्रा यंदाच्या आशियाई स्पर्धेस मुकणार असल्याने भालाफेकीत हिंदुस्थानची मदार रोहित यादववर असेल. रोहितने अलीकडच्या काळात सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. ८७.६८ मीटर ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम फेक आहे. इंडियन अॅथलेटिक्स मालिकेच्या अंतिम फेरीतही त्याने ८१.१० मीटर भाला फेकत अव्वल स्थान पटकावले. नीरजच्या अनुपस्थितीत रोहितवर अपेक्षांचे मोठे ओझे असेल; पण त्याच्या भाल्याला पदकाची धार लावण्याची क्षमता आहे.

सुरुची फोगाट बंदुकीतून पदकाचा निशाणा!

अवघ्या १९ वर्षांच्या सुरुची फोगाटने २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने हिंदुस्थानच्या विश्वासू नेमबाजांमध्ये स्थान मिळवले आहे. जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केल्यानंतर आता आशियाई स्पर्धेच्या मंचावरही सुवर्णवेध घेण्याची तिची तयारी आहे.

साक्षी चौधरी – रिंगमध्ये ‘गोल्डन पंच’चा निर्धार!

हिंदुस्थानची महिला बॉक्सिंगमधील उदयोन्मुख खेळाडू म्हणून साक्षी चौधरीकडे पाहिले जात आहे. २०२६च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. मात्र, आशियाई स्पर्धेच्या रिंगमध्ये तिचे लक्ष्य रौप्य नव्हे, तर सुवर्णपदकावरच आहे. पदार्पणातच प्रतिस्पर्थ्यांना धक्का देत भारताचा तिरंगा उंचावण्याची साक्षीची तयारी आहे.

सुजित कलकल – आखाड्यात कुस्तीचा धडाका!

हिंदुस्थानी कुस्तीपटू सुजित कलकलही पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेच्या आखाड्यात उतरणार आहे. गेल्या काही काळात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भल्याभल्या प्रतिस्पर्थ्यांना आपल्या आक्रमक डावपेचांनी चितपट केले आहे. निवड चाचण्यांमध्येही त्याची कामगिरी प्रभावी ठरली. त्याची आक्रमक कुस्ती हिंदुस्थानच्या पदकतालिकेत भर घालू शकते.

आयुष शेट्टी – मोठ्या कामगिरीची अपेक्षा

बॅडमिंटनमधील युवा चेहरा आयुष शेट्टीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने मोठा उलटफेर करत अव्वल मानांकित आणि जगज्जेता शी युकी याला पराभवाचा धक्का दिला होता. या विजयाने आयुषच्या आत्मविश्वासाला पंख मिळाले आहेत. आता आशियाई स्पर्धेच्या कोर्टवरही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. आयुष शेट्टी हा आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी जिवाचे रान करेल.

Comments are closed.