बेरोजगार गणपतीवाले … स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तीन मित्रांचा दुष्काळी परिस्थितीत तग धरण्यासाठी विलक्षण संघर्ष

स्पर्धा परीक्षेची दुनियाच न्यारी! स्वप्न गरूडभरारी घेण्याचे, पण भविष्य अनिश्चित! या दुनियेत तग धरून राहणे ही सोपी गोष्ट नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांनी घरची वाट धरली… पण तीन मित्रांनी एकत्र येऊन या परिस्थितीशी सामना करण्याचा मार्ग शोधला आणि जन्म झाला ‘बेरोजगार गणपतीवाले’चा! ना नफा ना तोटा असा हा सगळा व्यवहार; पण गणेशमूर्तीच्या विक्रीतून निदान पुढच्या दोन महिन्यांची तरी तजवीज झाली, हा आनंद या तिघांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहत होता!

स्पर्धा परीक्षेचे विश्व मोठमोठी स्वप्ने दाखवणारे, स्वप्नांना महत्त्वाकांक्षेचे पंख देणारे! पण हे स्वप्न केव्हा प्रत्यक्षात उत्तरेल याची कोणतीही शाश्वती नाही. स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात किती उलटे पोहायचे आणि किती वाहवत जायचे याचे भान ज्याला आले तोच या स्पर्धेत तग धरतो. केवळ हुशारी असूनही भागत नाही, त्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळही असावे लागते.

गंगापूर तालुक्यातील ऋषिकेश ठोंबरे, ज्ञानेश्वर पाटेकर आणि बीड जिल्ह्यातील आकाश कोपनर असे सर्वसामान्य कुटुंबातील तिघे जण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरात आले. ऋषिकेशने कला माध्यमातून पदवी घेतली असून तो एमपीएससीची तयारी करतोय. आकाश आणि ज्ञानेश्वर हे दोघे बी.एस्सी. झाले असून ते बँकिंगची तयारी करत आहेत. घरची परिस्थिती बेताचीच. स्पर्धा परीक्षेच्या अथांग डोहात टिकायचे असेल तर संघर्षही तेवढाच कठीण असेल याचे भान असलेले त्रिकूट. शिकून सुशिक्षित होता येते, पण नोकरी मिळत नाही हे वास्तव. ‘बेरोजगार’ ही देखील एक पदवीच!

  • छत्रपती संभाजीनगरात अगदी काटकसरीनेही राहायचे म्हटले तरी साधारण सात हजार रुपये महिन्याकाठी लागतात. गणेशमूर्तीच्या विक्रीतून सगळा खर्च वजा जाता निदान दोन महिने कसेबसे निघतील एवढी तजवीज झाली, असे ऋषिकेश ठोंबरे म्हणाला. परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते, फक्त आपण त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही त्याला वाटते.

असा उभा राहिला पैसा

यंदाच्या दुष्काळाने घात केला. एवढे शिकून नोकरी नाही. घरी पैसे मागायचे तरी कसे, कारण तिकडेही आभाळ फाटलेले! मग या तिघांनीही ‘बेरोजगार’ पदवीचा उपयोग करायचे ठरवले. गणेशमूर्तीच्या विक्रीचे स्टॉल टाकण्याचे ठरले. स्टॉल टाकण्याचे ठरवले, पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून उभा करायचा, असा प्रश्न उभा राहिला. दोन महिन्यांचे रूमचे, मेसचे पैसे थांबवले. क्लासचालकांनी काही मदत केली. स्टॉल टाकण्याएवढे पैसे उभे राहिले.

नाव बघूनच लोक आले

जिल्हा परिषदेच्या मैदानावर स्टॉल टाकला, ‘बेरोजगार गणपतीवाले’ ! २०० मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या. नाव बघून लोक येतील का, अशी शंका होती. पण नाव बघून लोक येत गेले. मागच्या तीन दिवसांत बहुतेक मूर्तीची विक्री झाली. अगदी बोटावर मोजण्याएवढ्या मूर्ती शिल्लक राहिल्या.

Comments are closed.