दुष्काळाच्या कराल दाढेत धाराशिव! आठही तालुक्यांत पहिली कळ लागू; 80 टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान, सोयाबीनचा फुलोरा करपला

आभाळाकडे डोळे लावून शेतकरी थकला, पण वरुणराजाला काही त्याची दया आली नाही. धाराशिवमध्ये भयंकर दुष्काळवणवा पेटला आहे. उधार-उसनवार करून केलेला खरीप दुष्काळाच्या मगरमिठीत सापडला आहे. संपूर्ण ऑगस्ट कोरडाठाक गेल्यामुळे सोयाबीन, कापूस, मका, तुरीसह इतर खरीप पिकांची वाताहत झाली आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने झालेल्या संयुक्त पीक पाहणीत जिल्हयातील आठही तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ लागू झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल ५३ महसुली मंडळांना दुष्काळाने ग्रासले असून ८० टक्क्यांपर्यंत पिकांचे नुकसान झाले आहे.

परंड्यात ३९ दिवसांचा खंड !

सोयाबीन फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. परंडा ३९ दिवस, भूम ३५, वाशी ३५, कळंब ३५, धाराशिव २७, तुळजापूर २७ आणि लोहारा २७ दिवस पावसाविना राहिले. उमरग्यात १७ दिवसांचा खंड नोंदविण्यात आला असून पुढे तो वाढण्याची शक्यता या पीक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना एकरी २० हजारांच्या मदतीची शिफारस

नांगरणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत शेतकऱ्याचा एकरी सुमारे १५ हजार रुपये खर्च झाल्याची समितीची नोंद आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच एकरपर्यंत किमान २० हजार रुपये प्रतिएकर मदत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. नुकसान ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास १० हजार रुपये, तर त्यापेक्षा अधिक नुकसान असल्यास २० हजार रुपये प्रतिएकर मदतीची शिफारस आहे.

अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानावर भयंकर परिणाम झाला आहे. जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस झाला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवली. जिल्ह्याची ऑगस्टची सरासरी १५४.४ मिमी आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ४३.१ मिमी म्हणजेच २८ टक्के पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील तयार सरासरी ६०३ मिलिमीटरच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३०८ मिलिमीटर म्हणजे ५१ टक्के पाऊस झाला आहे.

मुळापर्यंत पोहोचला दुष्काळ

१५ ऑगस्टनंतर संपूर्ण जिल्ह्यात पिकांच्या मुळांच्या भागातील उपलब्ध ओलावा २५ – टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. आठ मंडळात तब्बल २१ दिवसांपेक्षा अधिक काळ उपलब्ध ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहिला. अशा परिस्थितीत उत्पादन जवळपास शून्यावर जाण्याची – भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पाण्याअभावी सोयाबीनचा फुलोरा करपून गळून पडला. अत्यल्प फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर झाले, परंतु भरणपोषणाअभावी तयार झालेल्या शेंगाही चपट्या झाल्या आहेत. काही ठिकाणी खोडमाशी
आणि पिवळ्या मोझें कचा प्रादुर्भावही दिसून आला आहे. यापुढे पाऊस पडला तरी आता हे पीक वाचण्याची सुतराम शक्यता नसल्याचा पाहणी समितीचा निष्कर्ष आहे.

२३ मंडळांत ८० टक्क्यांहून अधिक नुकसान

आयआयटी मुंबईच्या पाहणीनुसार ५३ बाधित मंडळांपैकी २३ मंडळांत हलकी, मध्यम आणि भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. आणखी २० मंडळांत हलक्या जमिनीत टक्क्यांपेक्षा अधिक, तर मध्यम व भारी जमिनीत ५० ते ६० टक्के नुकसान ८० आहे. दहा मंडळांतही ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान नोंदविण्यात आले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच काही गावांमध्ये माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. काही गावांत टँकरही सुरू करण्यात आले आहेत. चारा उपलब्धता व मागणीचा आढावा घेऊन चारा छावण्यांचे नियोजन, पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव ठेवणे आणि जलसंधारणाची कामे वेगाने हाती घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आता शासनाच्या निर्णयाकडे नजर…

अहवालानुसार उपलब्ध निर्देशांक १ ऑगस्टनंतर गंभीर दुष्काळाची स्थिती दर्शवित आहेत. त्यामुळे तातडीने सत्यापन, पंचनामे आणि आवश्यक प्रपत्रांची पूर्तता करण्याची शिफारस करण्यात आली आहे. खरीप २०२६ साठी दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे वेळापत्रक अहवालात नमूद आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता प्रश्न केवळ नुकसानभरपाईचा नाही, तर उभ्या राहिलेल्या दुष्काळी संकटातून कुटुंब आणि शेती कशी सावरणार, हा आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदोपत्री प्रक्रियेचा वेग वाढवून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर मदत पोहोचविणे गरजेचे ठरणार आहे.

Comments are closed.