खरिपातील पीक करपले, रब्बीला ओलच नाही; तलाव, विहिरींनी गाठला तळ; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

जामखेड तालुक्यात अल्प पावसावर उशिरा खरीप पेरण्या ८६ टक्के झाल्या आहेत. सोयाबीन, उडीद मूग व इतर पिके फुलोऱ्यात आली असताना पावसाने दडी मारल्याने सर्व पिके धोक्यात आली आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले; परंतु अद्यापि एकही मोठा पाऊस झाला नाही व वावरातून पाणी बाहेर पडले नाही. त्यामुळे नदी, नाले व तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. तीन टँकर्सद्वारे तालुक्यात पाणीपुरवठा सुरू असून, १० ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अल्प पावसामुळे तालुक्यात भीषण टंचाईची चाहूल लागली आहे.

ऑगस्ट कोरडाच गेला, निम्मा सप्टेंबरही कोरडाच

जामखेड तालुका रब्बीचा म्हणून ओळखला जात असला, तरी खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग या नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. तालुक्यात खरीप पिकाचे उद्दिष्ट ६२ हजार १९५ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी तालुक्यातील खरीप पिकांच्या पेरण्या १५ जूनपर्यंत पूर्णत्वास येतात; पण यंदा जूनच्या २३ तारखेपासून दोन-तीन दिवस रिमझिम पाऊस आला व त्या पावसावरच जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या. जुलैमध्ये ५ व ६ रोजी भीजपाऊस झाला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले होते.

भुतवडा, खैरी प्रकल्प वगळता इतर तलाव कोरडे

पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले आहेत; पण समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे नवीन पाण्याची आवक तलावात झाली नाही. आहे तो पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. खैरी प्रकल्पात १०.८ दशलक्ष घनफूट, तर जुना भुतवडा तलावात ८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच रत्नापूर, धोत्री, मोहरी, घोडेगाव, धोंडपारगाव व नवीन भुतवडा तलावाचा पाणीसाठा निरंक आहे. नदीला पाणीच नसल्याने कोल्हापूर पद्धतीचे पाचही बंधारे कोरडे पडले आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने भुतवडा व खैरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला आहे. जलाशयाकडे जाणारा वीजपुरवठा भरारी पथकामार्फत पूर्णतः बंद केलेला आहे. तालुक्यात राजेवाडी, खुरदैठन व बांधखडक या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, तर १० गावांत बोअर, विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

‘जलजीवन ‘च्या कामावरही प्रश्नचिन्ह

गावागावांत पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. मात्र, आजही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत असल्याने या योजनेच्या प्रत्यक्ष परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या कामांवर मोठा खर्च होऊनही नागरिकांची तहान भागत नसेल, तर या कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि पाणी उपलब्धतेचा स्रोत यांचा आढावा घेण्याची गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Comments are closed.