मला आधीच याची कल्पना..’, टीम इंडियाकडून वारंवार दुर्लक्ष झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार नेमकं काय म्हणाला?

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) जवळपास चार वर्षांपासून भारतीय संघापासून दूर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याच्याकडे भारतीय संघाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, आयपीएलमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल 2025 आणि 2026 मध्ये त्याने आरसीबीकडून शानदार गोलंदाजी केली. सलग दोन वेळा आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका राहिली. आता भुवीने भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
भुवनेश्वर कुमारने जतिन सप्रू (Jatin Sapru) यांच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या पुनरागमनाबाबत चर्चा केली. त्याने म्हटले की, “मला नक्कीच एक संधी मिळायला हवी.” मात्र, भारतीय संघात पुनरागमन करणे हे त्याचे एकमेव ध्येय नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, “मी कोणाला काही सिद्ध करण्यासाठी खेळत नाही. पण जर माझे भारतीय संघात पुनरागमन झाले, तर माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल. भुवीने असेही सांगितले की, आता तो त्या टप्प्यातून पुढे आला आहे, जेव्हा तो पुढील मालिकेची वाट पाहत असायचा.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर भुवनेश्वरला असे वाटले होते की, निवडकर्ते त्याला पुन्हा भारतीय संघात संधी देऊ शकतात. त्याला टीम मॅनेजमेंटकडून फोनही आला होता. त्यामुळे आपले भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते, असे त्याला वाटले. मात्र, त्यानंतर त्याचे पुनरागमन झाले नाही. नंतर त्याला परिस्थितीची जाणीव झाली.
भुवी म्हणाला, “त्यावेळी मला काय सुरू आहे, हे समजले होते आणि मी ते स्वीकारलेही होते. हे माझ्यासाठी सोपे नव्हते. मात्र, माझ्या कुटुंबाने मला या काळात खूप साथ दिली.”
टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतरच भुवनेश्वरला जाणवले होते की कदाचित त्याने भारतासाठी आपला शेवटचा विश्वचषक खेळला आहे. ॲडलेडमध्ये झालेल्या पराभवानंतर भुवी आपल्या खोलीत गेला. त्याने पत्नीला फोन करून कदाचित भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक सामना होता, असे सांगितले. पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण निराशाजनक होते. त्यामुळे आपल्या अनुभवाच्या आधारे भुवीने पत्नीशी हा संवाद साधला होता. त्याने सांगितले की, “जेव्हा एखाद्या स्पर्धेत तुमचा पराभव होतो, तेव्हा निवडकर्ते पुढे पाहतात आणि ते योग्यही आहे.
भुवनेश्वर कुमारने भारतासाठी 21 कसोटी सामन्यांत 63 विकेट्स घेतल्या आहेत. तर 121 वनडे सामन्यांत त्याच्या नावावर 141 विकेट्स आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 87 सामन्यांत 90 विकेट्स घेतल्या आहेत.
Comments are closed.