शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण, रमेश म्हात्रे प्रकरणाची शनिवारपासून सुनावणी; साक्षीदारांचे जबाब नोंदवणार
शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आता शनिवार १९ सप्टेंबर रोजी साक्षीदार, पंच यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. न्यायमूर्ती एन.पी. वासाडे यांच्यासमोर ही साक्ष होणार असून त्यावर पुढील खटल्याचे भवितव्य निश्चित होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील महिला आरोपी साधना करांडे हिच्या जामिनावरही शनिवारीच निर्णय घेतला जाणार आहे. या खटल्याची नियमित सुनावणी होणार असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉ. सृष्टी बाविस्कर व डॉ. वैभव साळुंखे यांना शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली होती. म्हात्रेसह प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय करांडे, साधना करांडे अशा पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी चौघेजण सध्या जामिनावर असून साधना करांडे ही अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे.
सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
आज पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना कल्याणच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील अॅड. प्रकाश साळशिंगेकर यांनी बाजू मांडली. तर करांडे हिचे वकील अॅड. उमेश काझी यांनी तत्काळ जामीन देण्याची मागणी केली. मात्र न्यायमूर्ती एन. पी. वासाडे यांनी तिच्या जामिनावर येत्या शनिवारीच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तोपर्यंत तिचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे.
Comments are closed.