चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे नखरे चालणार नाहीत! भारताचे सडेतोड उत्तर

पुरुष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा भारतात आयोजित केली आहे. ही स्पर्धा जालंधर आणि मोहली येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची मागणी पाकिस्तानने केली असता त्यावर हॉकी इंडियाने जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. हॉकी इंडियाच्या महासचिवांनी स्पष्ट केले की पाकिस्तानची मागणी स्वीकारली जाणार नाही.
ही स्पर्धा भारतातून हलवावी अथवा पाकिस्तानचे सर्व सामने एका तटस्थ ठिकाणी खेळवावेत, अशी मागणी पाकिस्तानने आशियाई हॉकी महासंघाकडे केली होती.
एका अधिकृत निवेदनात, पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष मोहउद्दीन अहमद वानी यांनी ठिकाण बदलामागे भारतासोबतचे तणावपूर्व संबंध असल्याचे कारण दिले. त्यांनी भारतातील पाकिस्तानी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.
भारताचे महासचिव भोलानाथ सिंग यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, “अशा कोणत्याही मागण्या स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच ठिकाणांमध्येही कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानने याआधीही असे केले होते. जर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळायचे असेल, तर त्यांना भारतात यावे लागेल.”
“जर का पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यास भारतात आला नाही, तर दोन पर्यायी संघ उपलब्ध आहेत. त्यांची जागा बांगलादेश किंवा ओमान घेऊ शकतो,” असेही सिंग यांनी पुढे म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या स्पर्धेत पाकिस्तानला सहभागी होण्याची परवाणगी दिली होती, मात्र पाकिस्तानने अद्याप आपल्या राष्ट्रीय संघाला भारतात प्रवास करण्याची परवाणगी दिलेली नाही.
आता अशी माहिती समोर येत आहे की, पाकिस्तानने भारताचा दौरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय आशियाई हॉकी फेडरेशनला कळवल्याचे समजते, पण याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.
सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेल्या एफआयएच ज्युनियर विश्वचषक आणि आशिया चषकातूनही माघार घेतली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत, पाकिस्तान, मलेशिया, चीन, जपान आणि कोरिया यांचा समावेश आहे.
Comments are closed.