‘स्वच्छ मुंबईचे शिल्पकार!’गणेशोत्सव देखाव्यातून सफाई कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना!
मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाला सलाम करणारा आगळावेगळा देखावा यंदा डिलाईल रोडच्या पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे. ‘स्वच्छ मुंबईचे शिल्पकार’ या संकल्पनेतून साकारलेला हा देखावा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सामाजिक संदेश देतो.
देखाव्याची मूळ संकल्पना व कलादिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी केले आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सफाई कर्मचारी केवळ कचरा गोळा करणारे कर्मचारी नसून ‘स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार’ आहेत, हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
'फ्रीसायकल'ची संकल्पना
देखाव्यामध्ये ‘फ्रीसायकल’ ही विशेष संकल्पना मांडण्यात आली आहे. वापरात नसलेल्या मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता गरजू व्यक्तींना देण्याचा संदेश यातून दिला जातो. फर्निचर, कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वस्तूंचा पुनर्वापर केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गरजूंपर्यंत उपयुक्त वस्तू पोहोचू शकतात.
टाकाऊ वस्तूपासून सजावट
प्लास्टिक बाटल्या, क्रॅप मेटल, ई-वेस्ट, कागद, लाकूड आणि इतर टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून सजावट साकारण्यात आली आहे. अशा प्रकारे पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा हा देखावा भक्तीबरोबरच सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या विचाराचा संदेश देणारा ठरत आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून ‘कलाकार कट्टा’ ही संकल्पनाही साकारण्यात आली आहे. गायन, वादन, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, मूर्तिकाम आणि पाककला अशा विविध कलांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या मोठय़ा प्रमाणातील कचऱ्याबाबतही या देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे. ‘मी तुमच्या शहराची कचऱ्याची गाडी बोलते आहे…’ या संकल्पनेतून नागरिकांशी थेट संवाद साधत ओला-सुका कचरा वेगळा करणे, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
Comments are closed.