धर्माचे बंधन नसते; ते मुक्त करते!

सरसंघचालकांचा युवांना संदेश : धर्म अन् रिलिजनमधील फरकही स्पष्ट

वृत्तसंस्था, उज्जैन

मध्यप्रदेशच्या उज्जैन येथे आयोजित तीन दिवसीय युवा धर्म संसदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचलाक डॉ. मोहन भागवत यांनी युवांना धर्माचा अर्थ आणि जीवनातील त्याचे महत्त्व समजावून सांगितले.  दीपप्रज्वल अणि वंदे मातरम्ने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. भागवत यांनी स्वत:च्या भाषणात ‘रिलीजन“ आणि ‘धर्म“ हे समानार्थी शब्द नसल्याचे सांगितले.

इंग्रजी शब्दकोशात ‘धर्म“ या संकल्पनेसाठी अचूक समानार्थी शब्द नाही. ‘रिलीजन“ हा शब्द ‘रिलिजियो“पासून आला असून त्याचा संबंध बांधण्याच्या संकल्पनेशी जोडला जातो, तर धर्म माणसाला बांधत नाही, तर मुक्त करतो असे उद्गार भागवत यांनी काढले आहेत.

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत भागवत यांनी भारत हा धर्मप्रान देश असल्याचे नमूद पेले. कोणत्याही नव्या विचाराचा किंवा जिज्ञासेचा शोध घेण्यासाठी आधी मन स्थिर आणि पूर्वग्रहांपासून मुक्त करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

1700 युवकांचा सहभाग

युवा धर्म संसदेत देशभरातून सुमारे 1700 विद्यार्थी आणि 300 हून अधिक विद्वान, शिक्षक, संशोधक आणि धर्माचार्य सहभागी झाले आहेत. पटकथालेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. धर्माची अस्तित्वपरक संकल्पना, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती आणि विचारांचा संघर्ष अशा समकालीन विषयांवर या धर्म संसदेत संवाद आणि व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

पुढील युवा धर्म संसद द्वारकेत

सेवाज्ञ संस्थानम् यांच्या वतीने युवा धर्म संसदेचे हे सहावे पर्व आयोजित करण्यात आले. यापूर्वी काशी, अयोध्या, मथुरा आणि हरिद्वार आणि कांचीपुरम येथे या कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. आता पुढील युवा संसद द्वारका येथे आयोजित करण्यात येणार आहे.

धर्म युवांना दिशा देतो

धर्म हा केवळ ज्येष्ठांसाठी नसून युवांनाही जीवनाची योग्य दिशा देणारा मार्ग असल्याचे भागवत यांनी सांगितले. महाभारताच्या शेवटच्या 5 श्लोकांमध्ये संपूर्ण महाभारताचा सारांश असल्याचे त्यांनी नमूद केले. धर्माच्या माध्यमातून काम, अर्थ आणि मोक्षाची प्राप्ती होते असे सांगताना त्यांनी धर्म समजून घेऊन आचरणावर आणण्यावर भर दिला. कोणालाही पीडा न देणे हाच सर्वांत मोठा धर्म असून दुसऱ्याला पीडा देणे हे महापाप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.