पंजाबमध्ये माजी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला.

पठाणकोट : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर पंजाबमध्ये हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात होता असा आरोप भाजपने केला आहे. बटालीनजीक घासीतपूर गावाबाहेर बिट्टू आणि त्यांच्या वाहनताफ्यावर काही लोकांनी अंडी अन् टॉमेटो फेकले आहेत. यादरम्यान बिट्टू यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करत यातील दोन जणांना पकडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्यावर अंडी अन् टॉमेटो फेकण्यात आले तसेच अनेक लोकांनी मला पकडले. जोपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक या  लोकांच्या विरोधात कारवाई करत नाहीत तोवर मी येथून हलणार नाही असे बिट्टू यांनी म्हटले आहे.

पठाणकोट येथून आम्ही नशाविरोधी मोर्चा सुरु करणार होतो, परंतु पंजाबमधून अमली पदार्थांचे सेवन संपविणारा कुठलाही मोर्चा निघू नये अशी आम आदमी पक्षाची इच्छा असल्याचा आरोप बिट्टू यांनी केला आहे.

आप सरकारवर निशाणा

रवनीत सिंह बिट्टू यांच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून भाजप नेत्यांनी पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था आणि आम आदमी पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुमारे 100 आप कार्यकर्त्यांनी वाहनांवर हल्ले केले आणि पंजाब पोलीस विभागाचे अधिकारीही यात सामील होते. ताफ्यातील वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. बिट्टू यांच्यावर हल्ला करत भाजपच्या ड्रग्जविरोधी अभियानावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप पंजाबमधील भाजप नेत्या जय इंदर कौर यांनी केला. तर पंजाबमध्ये गुंडा राज असल्याचा दावा भाजपनेते विजय सांपला यांनी केला आहे.

राघव चड्ढांकडून प्रश्न उपस्थित

पंजाबमध्ये ड्रग्जच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या लोकांवर हल्ले होत आहेत आणि बिट्टू यांच्यावरील हल्ला देखील हीच स्थिती दाखवितो असा दावा भाजप नेते एच.एस. फूलका यांनी केला आहे. आप भाजपमुळे घाबरून गेला आहे आणि याचमुळे बिट्टू यांच्यावर हल्ला करविण्यात आला आहे. झेड प्लस सुरक्षा प्राप्त माजी केंद्रीय मंत्र्यावर हल्ला होण्याचा प्रकार पंजाबमध्ये सामान्य लोकांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करत असल्याचे वक्तव्य राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केले आहे.

Comments are closed.