राजनाथ सिंह यांचे 'हाल'चे कौतुक

विमाने-हेलिकॉप्टर्स वायुदलाला दिल्याने समाधान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (हाल) या कंपनीने भारतीय वायुदलाला स्वदेशनिर्मिती आणि उत्कृष्ट गुणवत्तेची युद्ध विमाने तसेच युद्ध हेलिकॉप्टर्स पुरविल्याने, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या कंपनीची प्रशंसा केली आहे. विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्या हस्तांतरणाचा शानदार कार्यक्रम शुक्रवारी येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राजनाथसिंग यांनी ‘हाल’च्या प्रगतीचे कौतुक केले.

‘हाल’ने अत्यंत कमी कालावधीत युद्धविमानांचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात यश मिळविले आहे. ही संस्था भारताला वायुसंरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. ‘हाल’ने तीन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये स्पृहणीय कामगिरी करुन दाखविलेली आहे. भारतीय रचनेच्या आणि भारतात विकसीत केलेल्या ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सची निर्मिती या संस्थेने केली असून शुक्रवारी या हेलिकॉप्टर्सची प्रथम खेप वायुदलाला हस्तांतरीत केली जात आहे. भारतनिर्मित हलक्या युद्धविमानांचा विकास आता अंतिम टप्प्यात आहे. या विमानांची अंतिम कार्यान्वयन परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या विमानांसंबंधीचे ‘एफओसी’ प्रशिक्षण विमान शुक्रवारी वायुदलाला देण्यात येत आहे. तसेच शुक्रवारीच ‘एचटीटी-40 या विमानप्रकाराचे पायाभूत प्रशिक्षण विमान वायुदलाच्या हाती देण्यात येत आहे. शुक्रवारचा हा कार्यक्रम भारताच्या इतिहासातील महत्वाचा आहे. भारताच्या वायुसंरक्षण क्षमतेत मोठी वाढ या तीन कामगिरींमुळे झाली आहे. यासाठी मी भारताच्या या कंपनीचे अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार राजनाथसिंग यांनी यावेळी काढले.

अवलंबित्वात घट

यापूर्वीच्या काळात भारताला आपल्या वायुदलाच्या साधनांसाठी खूपच मोठ्या प्रमाणात विदेशांवर अवलंबून रहावे लागत होते. भारतात युद्धविमानांचे महत्वाचे सुटे भाग निर्माण होत नव्हते. त्यामुळे पडेल ती किंमत मोजून हे भाग विदेशांमधून आणावे लागत होते आणि ते वेळेवर मिळतील याची शाश्वती नव्हती. तथापि, आज ‘हाल’च्या प्रयत्नांमुळे आणि कर्तृत्वामुळे भारताचे विदेशांवरचे अवलंबित्व पुष्कळ प्रमाणात कमी झाले आहे. बारा वर्षांपूर्वी संरक्षण प्रकल्प विकसीत करण्याची गती अत्यंत धीमी होती. त्यामुळे केवळ पैसा खर्च होत असे आणि हाती फारसे काही लागत नसे. पण, आता परिस्थितीत बरीच मोठी सुधारणा झाली असून भारत आता शस्त्रास्त्रांचा निर्यातदार देश बनला आहे. आमचे विदेशांवरचे अवलंबित्व आगामी काळात आणखी कमी होणार असून वायुसंरक्षण क्षेत्रात ‘हाल’ आणि तत्सम संस्थांमुळे देशाचा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ही प्रगती अशीच पुढे होत राहणार आहे, अशी भलावण संरक्षणमंत्री सिंग यांनी केली.

एकत्रित उद्योगाची आवश्यकता

भारताला सध्या एकत्रित विमानविकास उद्योगाची आवश्यकता आहे. या उद्योगाकडून नागरी आणि सैनिकी अशा दोन्ही प्रकारांच्या विमानांचा आवश्यकता स्वदेशातच पूर्ण करण्याची क्षमता विकसीत करण्यात आली पाहिजे. केंद्र सरकार त्यादृष्टीने प्रयत्नशील असून लवकरच आम्ही अशा उद्योगाची स्थापना करण्यात यशस्वी होणार आहोत, असा विश्वासही राजनाथसिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Comments are closed.