कल्ट सिनेमा – कल्ट आपल्या घरात…

>> सोहम पिंगळीकर, [email protected]

कल्टच्या कल्पनेत ‘वेगळेपणा’ महत्त्वाचा ठरतो, मात्र एखादा सिनेमा वा मालिका टीव्हीच्या पुनरावृत्तीतून घरगुती झाल्यावर वेगळेपणापेक्षाही त्या कलाकृतीसोबत कल्टसारखीच भावनिक जवळीक तयार होते. ही प्रक्रिया कल्टिफिकेशनपेक्षा वेगळी ठरते.

90च्या दशकात टीव्हीने सिनेमाच्या पाहण्याच्या जागेत मोठा बदल केला. एकेकाळी थिएटर, व्हिडीओ पार्लर किंवा बी-ग्रेड सिनेमाच्या विशिष्ट प्रेक्षक वर्तुळात दिसणारा सिनेमा घरात आला. पुनपुन्हा दिसू लागला. घरच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला. आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे 80 च्या दशकात रामसे बंधूंच्या सिनेमांनी हॉररचा एक विशिष्ट अवकाश तयार केला. नंतर त्यांच्या ‘झी हॉरर शो’ या मालिकेने त्यांचा भयपट घराच्या दिवाणखान्यात आणला. रामसे बंधूंच्या सिनेमाचा बी-ग्रेड, अतिरेकी, कधी अश्लील, तर कधी विनोदी असा अवकाश होता; पण दिवाणखान्यातल्या टीव्हीवर येताना त्याचे स्वरूप बदलले. अश्लीलता, अतिरेक कमी झाला; कथा आटोपशीर झाल्या. सुनसान माळरान, जुन्यापुराण्या हवेल्यांऐवजी आलिशान बंगले दिसू लागले. अशा प्रकारे थिएटरमधला ‘कमी दर्जाचा’ सिनेमा घरातली सामूहिक आठवण झाला.

हे केवळ माध्यमांतर नव्हे, तर यात घरगुतीकरणाची प्रक्रियाही अंतर्भूत आहे. घरगुतीकरण म्हणजे एखादी सांस्कृतिक वस्तू घरगुती माध्यमातून वारंवार अनुभवली जाऊन रोजच्या जीवनातील परिचित वस्तू बनण्याची प्रक्रिया. आता ही संकल्पना लोकप्रियता किंवा कल्टिफिकेशन यापेक्षा थोडी वेगळी आहे. कल्टच्या कल्पनेत ‘वेगळेपणा’ महत्त्वाचा आहे. काहीतरी असं, ज्याच्याशी एका विशिष्ट प्रेक्षक समूहाचं विशेष नातं आहे, पण टीव्हीचे काम याच्या अगदी उलट आहे. टीव्हीने विशेष वाटणाऱ्या गोष्टी रोजच्या करून टाकल्या. ‘झी हॉरर शो’मध्ये ही प्रक्रिया दिसते. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मधून तिचा वेगळा अवतार दिसतो. या सदराच्या पहिल्या अकरा लेखांमध्ये आपण प्रामुख्याने सिनेमा कल्ट कसा होतो? कशामुळे होतो? त्याचे वेगळेपण आणि त्याची ओळख कशात आहे? यावर विचार केला. आता प्रश्न थोडा वेगळा आहे – सिनेमा टीव्हीच्या पुनरावृत्तीतून घरगुती झाल्यावर त्याचं काय होतं?

2006 मध्ये पहिल्यांदा ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिका प्रसारित झाली तेव्हा तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण वारंवार झालेले पुनर्प्रसारण आणि नंतरच्या डिजिटल प्रसारामुळे मालिकेला नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. या नव्या प्रेक्षकांनी नव्याने मालिका पाहिली, त्यातल्या व्यक्तिरेखा, संवाद आणि विनोद नव्याने आत्मसात केले. हळूहळू अधिकाधिक लोक ही मालिका बघू लागले. एकेकाळी मर्यादित असलेली ओळख व्यापक सांस्कृतिक स्मृतीचा भाग झाली. 2017 मध्ये आलेल्या पुनरागमनाने या नव्या सांस्कृतिक आयुष्याची व्याप्ती स्पष्ट झाली. या प्रक्रियेचं दुसरं टोक म्हणजे ‘सूर्यवंशम’. ‘सूर्यवंशम’ कल्ट आहे की नाही? हा प्रश्न इथे महत्त्वाचा नाही. मुळात कोणी ठरवून हा सिनेमा पाहिला का? असं विचारलं तर फार कमी लोक सापडतील… आणि तरीही ठाकूर भानुप्रतापचा दरारा आणि गरीब हिराची प्रेमकहाणी आणि सक्सेस स्टोरी प्रत्येकाने असंख्य वेळेला पाहिलेली असेल. याचं कारण म्हणजे कधीही टीव्ही लावला की, सेट मॅक्सवर ‘सूर्यवंशम’ चालू असे.

1999 मध्ये ‘सूर्यवंशम’ आला आणि त्याच वर्षी सेट मॅक्सची निर्मिती झाली. आता सतत नवीन सिनेमांच्या प्रसारणाचे हक्क मिळवणे परवडणारे नसते. त्यापेक्षा एकदा हक्क मिळालेला सिनेमा पुनः पुन्हा पुनर्प्रसारण करणे सोपा पर्याय असतो. मग नुकताच नवा आलेला सिनेमा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणून प्रेक्षकांनाही तो आवडला. नंतर मात्र त्याने मॅक्सवर कायमचा मुक्काम ठोकला. मग पिक्चर कधी सुरू झाला, कधी संपला, कोणालाही परवा नसे. जेवताना एक भाग पाहिला, मध्ये जाहिरात आली की, चॅनेल बदललं, पुन्हा एकदा अंदाज घेतला, महत्त्वाचा सीन आला की, काही वेळ पाहिलं, असं करत या सिनेमाची पारायणं झाली. कालांतराने ‘सूर्यवंशम’चं सेट मॅक्सवरील कायम वास्तव्य सगळ्यांच्या लक्षात आलं… आणि मग त्याला गमतीने राष्ट्रीय पिक्चर म्हटलं जाऊ लागलं. त्यावर विनोद होऊ लागले. पुनर्प्रसारणामुळे हा सिनेमा लक्षात राहिला, ठरवून न पाहताही सगळ्यांना पाठ झाला. अमिताभचा डबल रोल, रेखाचा आवाज आणि संवादांनी सांस्कृतिक फर्निचरचे स्वरूप घेतलं. विशेष दखल घेतली नसली तरी सूर्यवंशमची विषारी खीर सर्वांनाच चाखावी लागली.

आणि हीच गोष्ट ‘कल्ट’च्या संकल्पनेला अस्वस्थ करते. घरगुती झालेली प्रत्येक गोष्ट कल्ट नसते. ‘सूर्यवंशम’ त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याची ओळख एखाद्या विशिष्ट चाहत्या वर्गाच्या वापरातून तयार झाली नाही. त्याची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली ती सतत होणाऱ्या प्रसारणामुळे. मग या घरगुतीकरणाला कल्टिफिकेशन म्हणता येईल का? बहुधा नाही. घरगुतीकरण ही कल्ट तयार होण्याची पद्धत नसून प्रेक्षकांशी जवळीक तयार करण्याची प्रक्रिया आहे.

बऱ्याच वेळा या टीव्हीमुळे झालेल्या घरगुतीपणातून कल्टसारखीच प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती. उदाहरणार्थ, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील तुलसीचा नवरा मिहिर. लोक रोज ठरावीक वेळेत मिहिरला पुनः पुन्हा पाहायचे. त्यामुळे मालिकेतल्या लाडक्या मिहिरचा मृत्यू झाला तेव्हा हा मृत्यू प्रेक्षकांच्या परिचित जगात व्यत्यय ठरला. प्रेक्षकांनी आपल्या घरातील व्यक्ती गेल्यासारखा शोक केला. असं म्हणतात की, त्या दिवशी अनेकांच्या घरात गॅसही पेटला नाही. काही म्हाताऱ्या बायकांनी तर निर्माती एकता कपूर हिचे पायसुद्धा धरले म्हणे. अगदी पुरुषही अश्रू ढाळत होते. या सगळ्या शोकाची लाट इतकी मोठी झाली की, निर्मात्यांना मिहिरला पुन्हा जिवंत करावे लागले.

यावरून लक्षात येतं की, घरगुतीकरणाचा शेवट कल्ट झाला नाही तरी त्यातून कल्टसारखीच भावनिक जवळीक तयार होते. म्हणूनच कल्ट घरगुती होतो का? या प्रश्नाचं उत्तर सरळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असं देता येत नाही. कारण सिनेमा घरात घुसल्याने भावनिक जवळीक तयार झाली तरी ही प्रक्रिया कल्टिफिकेशनपेक्षा वेगळी आहे. पुनरावृत्ती सिनेमाला परिचित करू शकते. घरातली उपस्थिती त्याला भावनिक करू शकते. टीव्ही त्याला नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो, पण यापैकी एकाही गोष्टीमुळे तो आपोआप कल्ट होत नाही. जवळीक तयार झाली म्हणजे कल्ट तयार झाला असे नाही. टीव्ही सिनेमा आणि प्रेक्षकांचे नातं बदलतो. कधी सिनेमा आवडतो, कधी त्यावर विनोद होतात, संवाद पाठ होतात, कधी एखाद्या व्यक्तिरेखेचा मृत्यू घरातल्या माणसाच्या मृत्यूसारखा वाटतो. तर कधी कधी सिनेमा फक्त बॅकग्राऊंडला चालू असतो.

हाच कल्ट आणि घरगुतीपणातला खरा फरक आहे. एखाद्या कल्ट सिनेमाकडे आपण पुनपुन्हा जातो, त्याचे अर्थ लावतो, रोजच्या आयुष्यात वापर करतो, पण घरात शिरलेला सिनेमा मात्र स्वतहून आपल्यावर आदळत राहतो.

(लेखक सिनेअभ्यासक व समीक्षक आहेत.)

Comments are closed.