FTA मुळे रोजगाराच्या नवीन संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा : 51 हजारहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे सुपूर्द

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘रोजगार मेळाव्या’ला संबोधित करताना त्यांनी भारतीय तरुणांच्या प्रतिभेने आणि कौशल्याने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केल्याचेही स्पष्ट केले. भारतीय नवोन्मेषक, उद्योजक आणि देशाच्या युवाशक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा असल्याचेही ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 व्या वार्षिक रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध सरकारी संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 तरुणांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सर्व तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करत जीवनातील या नवीन प्रारंभासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी सर्व तरुणांना संबोधित करताना देशात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. या उत्सवांच्या वातावरणात, आजच्या दिवसाने हजारो कुटुंबांच्या जीवनात नवीन आनंद आणल्याचेही ते म्हणाले. आज देशभरातील 51 हजारहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना तुम्ही भारत सरकारच्या सेवेत सामील होत आहेत. या वाटचालीत तुमच्यासारख्या तरुणांची महत्त्वाची भूमिका असेल, असे पंतप्रधानांनी नवनियुक्त तरुणांना सांगितले.

गेल्या काही वर्षांत भारताने जवळपास 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार (एफटीए) केले आहेत. हे एफटीए आपल्या तरुणांसाठी संधींची नवीन दारे उघडत आहेत. असे व्यापार करार आपल्या उद्योजकांसाठी नवीन भागीदारीचा मार्ग मोकळा करतात, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देतात आणि आपल्या तरुणांसाठी नवीन करिअरच्या संधी निर्माण करतात. भारत सरकारने आपल्या तरुणांना भविष्यासाठी तयार करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांना सातत्याने बळकट करणारा असावा. तरुण म्हणून तुमच्या सहकारी तरुणांप्रति तुमची एक विशेष जबाबदारी आहे. आज आपण पाहतो की, आपल्या तरुणांच्या प्रतिभेने आणि कौशल्याने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे. जगाला आपल्या नवोन्मेषक, उद्योजक आणि युवाशक्तीकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

‘ब्रिक्स’च्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम

ब्रिक्स शिखर परिषद 2026 संदर्भातही पंतप्रधानांनी भाष्य केले. ब्रिक्स शिखर परिषद काही दिवसांपूर्वीच संपन्न झाली. ब्रिक्स सहकार्य केवळ सरकारांपुरते मर्यादित राहू नये, यासाठी भारताने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर आपले उद्योजक, शेतकरी, महिला आणि तरुण या भागीदारीत सक्रियपणे सहभागी आहेत. याच दृष्टिकोनातून ‘ब्रिक्स कनेक्ट’ आणि ‘ब्रिक्स एमएसएमई सहकार्य पोर्टल’ यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले.

रेल्वे, गृह, संरक्षण विभागात नियुक्त्या

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नवनियुक्त उमेदवार केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील. यामध्ये महसूल विभाग, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि संरक्षण मंत्रालय यांचा समावेश आहे. निवेदनानुसार, 20 व्या रोजगार मेळाव्यापर्यंत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये 12.75 लाख तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

तरुणांसाठी संधींची नवी दारे…

भारताने 40 देशांसोबत मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी केली आहे. हे करार आपल्या तरुणांसाठी संधींची नवी दारे उघडत आहेत. असे व्यापारी करार आपल्या उद्योजकांसाठी नवीन भागीदारी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश आणि आपल्या तरुणांसाठी नवीन करिअरच्या संधी निर्माण करतात.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Comments are closed.