केरळ नौदल अकादमीतून बांगलादेशीला अटक – TMarathiNews

बनावट ओळखपत्र सापडले : लॉन्ड्री विभागात कंत्राटी तत्त्वावर होता सेवेत

वृत्तसंस्था/ तिरुवनंतपुरम

केरळमधील एझिमाला नौदल अकादमीत बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय नागरिक असल्याचे भासवणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख 32 वर्षीय बिप्लब सोरेन अशी पटली आहे. तो अकादमीच्या लॉन्ड्री विभागात कंत्राटी कामगार होता. चौकशीदरम्यान बनावट ओळखपत्र सापडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, तो वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.

नौदल अधिकाऱ्यांना बिप्लबच्या वागणुकीवर संशय आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. याचदरम्यान नौदल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री त्याची चौकशी करत कागदपत्रांची पडताळणी केली. याप्रसंगी त्याच्याकडे बनावट ओळखपत्र सापडल्यानंतर त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान मोबाईलमध्ये सापडलेल्या कागदपत्रे आणि माहितीमध्ये तो बांगलादेशी नागरिक असल्याचे दिसून आले. बिप्लब सोरेन जवळपास वर्षभरापासून एका संवेदनशील संरक्षण संस्थेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्याच्या राष्ट्रीयत्वाची ओळख अज्ञात असल्याने सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. बिप्लबने बनावट कागदपत्रे मिळवून त्या संवेदनशील संरक्षण संस्थेत प्रवेश कसा मिळवला, याचा तपास यंत्रणा आता करत आहेत.

नोकरी देणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी

बिप्लब सोरेन अकादमीमध्ये किती काळ काम करत होता, याचाही तपास अधिकारी करत आहेत. तसेच त्याला ही नोकरी कोणी दिली आणि या प्रकरणाचे काही महत्त्वपूर्ण सुरक्षा परिणाम आहेत का, याचाही तपास केला जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. कन्नूर जिह्यातील विविध भागांमध्ये कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू असलेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Comments are closed.