दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त, काजू-बदामावर ताव मारल्याच्या घटनेनंतर
दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱया बैठका म्हणजे निव्वळ औपचारिकता असल्याचे सातत्याने जाणवत आहे. नांदेडमधील बैठकीत खासदारांनी काजू-बदामावर ताव मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अकोला येथील बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे समोर आल्याने प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती विभागातील 56 तालुक्यांची दुष्काळ आढावा बैठक बोलवली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या या बैठकीत अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाईन उपस्थित होत्या. अमरावती विभागातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांनीही बैठकीत सहभाग घेतला.
काँग्रेस आमदार अमित झनक यांनी कृषिमंत्र्यांच्या बैठकीतील हा प्रकार निंदनीय असल्याची टीका केली आहे. कृषिमंत्र्यांसमोर आणि इतर संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत असे प्रकार होत असतील ते निषेधार्हच आहेत. संवेदना हरवल्याचे आज पाहायला मिळाले, असे आमदार झनक यांनी म्हटले आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहण्यात दंग
बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी मोबाईलवर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक पाहण्यात ते दंग होते. काजू-बदाम प्रकरणावरून कृषिमंत्री भरणे यांना शेतकरी आणि शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता मोबाईल प्रकरण चर्चेत आल्याने भरणे यांनी सावध पवित्रा घेत माहिती घेऊन कारवाई करू, अशी सारवासारव केली.
Comments are closed.