'SIR' अंतर्गत नोटिसांची झुंबड
निवडणूक आयुक्तांसह परराष्ट्रमंत्री जयशंकर, माजी लष्करप्रमुख द्विवेदींना नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या देशभरात मतदारयादी पडताळणी मोहीम (एसआयआर) मोहीम सुरू असतानाच दिल्लीत जाहीर झालेल्या प्रारुप यादीनंतर थेट निवडणूक आयुक्तांनाच एसआयआर नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना एसआयआरची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच माजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह पत्नीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या कुटुंबीयांनाही नोटीस बजावल्यामुळे पडताळणी मोहिमेने गती पकडल्याचे दिसत आहे. त्यांच्याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, तसेच काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांची नावेही या यादीत आहेत.
एसआयआर या प्रक्रियेचा उद्देश मतदारयादीतील त्रुटी सुधारणे आणि ती अद्ययावत करणे हा आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी एसआयआरनंतर मतदार प्रारुप यादी जाहीर झाली आहे. अनेक मतदारांची नावे वगळल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने नोटिसांचा सपाटा लावत यादी पारदर्शक बनविण्यासाठी जोर धरल्याचे दिसत आहे. नोटीस जारी करण्यात आलेल्यांमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचेही नाव समोर आले आहे. याव्यतिरिक्त दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावेही या यादीत समाविष्ट आहेत.
या नोटीस जारी करण्यामागची विशिष्ट कारणे नमूद केली आहेत. यामध्ये नावांच्या स्पेलिंगमधील तफावत ते मागील ‘एसआयआर’मधील नोंदींशी नावे जुळली नाहीत, अशा विविध मुद्यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये नोंदींमधील ‘तार्किक विसंगती’ असल्याचे कारण दिले आहे. या प्रारुप यादीत नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्तीला मतदार यादीतून वगळण्यात आले आहे, असा अर्थ होत नाही. तर ही मतदार नोंदींच्या पडताळणी प्रक्रियेचा एक भाग आहे. संबंधित नोंदींबाबत स्पष्टीकरण किंवा पडताळणी सुलभ करण्यासाठी या नोटिसा जारी केल्या जातात ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
नावातील स्पेलिंग तफावतीमुळे निवडणूक आयुक्तांना नोटीस
नोटीसच्या यादीनुसार, निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांना त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमधील तफावतीमुळे नोटीस बजावण्यात आली आहे. विशेषत: मतदारयादीत नोंदवलेले नाव आणि इतर उपलब्ध नोंदी यांच्यात तफावत आढळून आली. परिणामी, पडताळणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस जारी करण्यात आली. नोटीसच्या यादीत नाव असणे हा स्वत:च मतदाराच्या पात्रतेबाबत किंवा स्थितीबाबत कोणत्याही अनियमिततेचा पुरावा नाही. एसआयआर प्रक्रियेदरम्यान नोंदींची परस्पर पडताळणी केली जाते. त्यामुळे जुन्या नोंदी आणि सध्याची माहिती यांच्यात तफावत असलेली प्रकरणे ओळखण्यास मदत होते.
Comments are closed.