'50-50' फॉर्म्युल्यावर आधारित अकाली दलाशी युती
पंजाबमध्ये आता छोट्या भावाच्या भूमिकेत नसणार भाजप
वृत्तसंस्था/ अमृतसर
भविष्यात पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात आघाडी झाल्यास ती केवळ समान जागावाटपाच्या अटीवरच होणार असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे. भाजप आता राज्यात छोटा भाऊ किंवा ज्युनियर पार्टनरची भूमिका पार पाडणार नसल्याचे पुरी यांनी अमृतसर येथे पत्रकारांशी संवाद साधत स्पष्ट केले आहे. मागील 22-23 जागांचा जुना फॉर्म्युला आता चालणार नाही असे पुरी यांनी म्हटले आहे. पंजाबच्या एकूण 117 विधानसभा जागांपैकी भाजप पूर्वी केवळ 22-23 जागांवर निवडणूक लढवत होता आणि उर्वरित जागांवर अकाली दल स्वत:चे उमेदवार उभा करत होता.
ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यात झालेल्या भेटीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला जोर मिळाला होता. तर कृषी कायद्यांच्या विरोधात अकाली दलने 2020 मध्ये रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकार पंजाबमध्ये अमली पदार्थांचा प्रकोप समूळ दूर करण्यासाटी प्रतिबद्ध आहे आणि राज्याच्या युवांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहे. आम आदमी पक्ष अन् मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शासन काळात पंजाबमधील स्थिती अत्यंत खराब झाली आहे. राज्याची जनता आणि पोलिसांना देखील असुरक्षित वाटत असल्याचा दावा पुरी यांनी केला आहे
Comments are closed.